महाराष्ट्र

सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेला तरुण बेपत्ता; घातपात की अपघात? CCTV मधील रहस्यमय व्यक्तीमुळे पोलिसांसमोर मोठा पेच

सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या एका तरुणाच्या बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. २४ तासांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही हैद्राबादमध्ये राहणारा, मूळ महाराष्ट्रातील गौतम गायकवाड याचा थांगपत्ता लागलेला नाही.

नेहा जाधव - तांबे

सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या एका तरुणाच्या बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. २४ तासांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही हैद्राबादमध्ये राहणारा, मूळ महाराष्ट्रातील गौतम गायकवाड याचा थांगपत्ता लागलेला नाही. पोलिस आणि वनविभाग संयुक्तपणे शोध घेत असून, दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या संशयास्पद व्यक्तीमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

किल्ल्यावर फिरायला गेलेला गौतम बेपत्ता

गौतम गायकवाड बुधवारी (दि.२०) आपल्या चार मित्र आणि एका मैत्रिणीसह सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता. दिवसभर गप्पा, फोटोसेशन आणि व्हिडीओ शूटिंग करून त्यांनी आनंद घेतला. संध्याकाळी गौतम लघुशंकेसाठी गेला. त्याचा मोबाईल त्या वेळी मित्रांकडेच होता. बराच वेळ तो परतला नाही, त्यामुळे मित्रांनी शोधाशोध सुरू केली.

किल्ल्यावरील पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीशेजारील कड्यालगत त्याच्या चपला आढळल्या, मात्र तो स्वतः कुठेच सापडला नाही. यामुळे तो कड्यावरून घसरून खाली पडला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, पोलिसांना या घटनेचा तपास करताना हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे हा अपघात आहे की काहीतरी वेगळं, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये संशयिताचा प्रवेश

गौतम बेपत्ता झाल्यानंतर दोन तासांनी, सिंहगडाच्या कोंढणपूर येथील वनसंरक्षण समितीच्या शुल्क नाक्याजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हुडी घातलेला एक अनोळखी तरुण पळत जाताना दिसत आहे. त्या व्यक्तीने चेहरा लपवला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी हे फुटेज गौतमचे नातेवाईक आणि मित्रांना दाखवले, मात्र त्याला कोणीही ओळखू शकले नाही. ही व्यक्ती गौतमच होती की दुसराच कोणी, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

घातपात की अपघात?

पोलिस दोन्ही दिशांनी तपास करत आहेत. गौतम कड्यावरून घसरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, सीसीटीव्हीतील रहस्यमय व्यक्तीमुळे घातपाताचा कोनही तपासात धरला आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता होण्यापूर्वी काढलेल्या व्हिडिओमध्ये गौतम पिवळ्या रंगाचा रेनकोट घातलेला दिसतो, तर फुटेजमधील व्यक्ती हुडी घालून दिसते. या विरोधाभासामुळे पोलिसांसमोर अधिक गोंधळ निर्माण झाला आहे.

हवेली पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने संपूर्ण किल्ल्याभोवती शोधमोहीम हाती घेतली आहे. स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांचीही मदत घेतली जात असून, संशयास्पद हालचाली किंवा माहिती असल्यास पुढे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार