(Photo - X/@Dev_Fadnavis) 
महाराष्ट्र

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-सोलापूर हवाई सेवा लवकरच होणार सुरू; 'या' तारखेचा ठरला मुहूर्त

बहुप्रतीक्षित अशा सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन प्रवासी विमानसेवा येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत.

नेहा जाधव - तांबे

बहुप्रतीक्षित अशा सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन प्रवासी विमानसेवा येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. ही सेवा स्टार एअर कंपनी मार्फत सुरू होणार असून, या संदर्भातील माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

होटगी रोड विमानतळावरून सुरू होणार उड्डाणे

होटगी रोडवरील सोलापूर विमानतळावरून या विमानसेवा सुरू होणार आहेत. यामुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी जलद गतीने थेट संपर्क साधता येणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी तसेच भाविक वर्गासाठी ही सेवा अत्यंत सोयीस्कर ठरणार असल्याचे मंत्री मोहोळ यांनी सांगितले.

तिकीट बुकिंग सुरू

दोन्ही विमानसेवांसाठीचे तिकीट बुकिंग आज शनिवार, २० सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. प्रवाशांना नियोजित वेळेनुसार या उड्डाणांचा लाभ घेता येईल.

सोलापूर ते गोवा सेवेनंतर आता दुहेरी सेवा

यापूर्वी ८ जून रोजी सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाली असून, ही सेवा आठवड्यातून चार दिवस उपलब्ध आहे. लवकरच ती सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू करण्याची तयारी फ्लाय-९१ कंपनीने केली आहे. यानंतर आता मुंबई आणि बंगळुरूसाठीच्या सेवांची भर पडत असल्याने सोलापूरकरांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) ची मंजुरी

सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर केले. त्यामुळे ही सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

VGF म्हणजे काय?

व्हायबिलिटी गॅप फंडिंग हे सरकारकडून खासगी कंपन्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य आहे. सार्वजनिक सेवा किंवा पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या प्रकल्पांत सुरुवातीला तोटा होण्याची शक्यता असते. अशा वेळी सरकार कंपन्यांना आर्थिक मदत करते. प्रवाशांची सर्व तिकिटे विकली गेली नाहीत तर त्याची भरपाई राज्य सरकार करते.

उड्डाणांचे वेळापत्रक

सोलापूर-मुंबई : प्रस्थान - दुपारी १२:५५ वा.

मुंबई-सोलापूर : प्रस्थान - दुपारी २:४५ वा.

बंगळुरू-सोलापूर : प्रस्थान - सकाळी ११:१० वा.

सोलापूर-बंगळुरू : प्रस्थान - दुपारी ४:१५ वा.

या नव्या हवाई सेवेमुळे सोलापूरकरांच्या प्रवासाच्या सोयींमध्ये मोठी भर पडणार असून, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींनाही नवे दालन उघडणार आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत