Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ X|@Info_Solapur
महाराष्ट्र

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Solapur Borewell Tragedy : सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे दीड वर्षांची उष्मती गावित बंद बोअरवेलमध्ये पडून मृत्युमुखी पडली. रात्रभर बचावकार्य सुरू होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबाला शासकीय मदत देण्याचं सांगितलं आहे.

Mayuri Gawade

सोलापूर : २००६ मध्ये हरियाणातील कुरुक्षेत्र येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्स या चिमुकल्याला तब्बल ५० तासांच्या बचावकार्यानंतर सुखरूप बाहेर काढलं होतं. त्या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं. आता २० वर्षांनंतर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात अशीच एक पण हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले. आई-वडिलांसह सर्वांनाच ती सुखरूप बाहेर येईल, अशी आशा होती. मात्र, तब्बल १३ तासांच्या बचावकार्यानंतर चिमुकलीला बाहेर काढण्यात आलं, तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेतातील बंद बोअरवेलमध्ये आढळली चिमुकली

समोर आलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे रविवारी (दि. २२) ही घटना घडली. उष्मती राहुल गावित असं मृत चिमुकलीचं नाव असून, ती मूळची नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शिसा येथील रहिवासी होती. उष्मतीचं कुटुंब ऊसतोड मजुरीसाठी या परिसरात आलं होतं. शेतात ऊसतोडीचं काम सुरू असताना सकाळच्या सुमारास उष्मती दिसेनाशी झाली. कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली. मात्र, ती सापडली नाही. त्यानंतर करकंब पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला. रात्री सुमारे ८ वाजता शेतातील बंद बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडून पाहणी करण्यात आली. त्यावेळी कॅमेऱ्यात एका लहान मुलीचा हात दिसला. त्यामुळे उष्मती बोअरवेलमध्ये अडकल्याचं स्पष्ट झालं. ही बोअरवेल अंदाजे ४५ ते ५० फूट खोल असल्याची माहिती आहे.

चिमुकलीला वाचवण्यासाठी रात्रभर धडपड

उष्मती बोअरवेलमध्ये अडकल्याचं समजताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. मुलीला बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह करकंब पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.

कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या एनडीआरएफच्या पथकालाही बचावकार्यासाठी बोलावण्यात आलं. आवश्यक यंत्रसामग्री पुण्याहून मागवण्यात आली. ही यंत्रसामग्री रात्री सुमारे २ वाजता घटनास्थळी पोहोचली. प्रशासन, पोलिस आणि बचाव पथकांनी रात्रभर चिमुकलीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळी बाहेर काढलं, पण जीव वाचला नाही

रात्रभर सुरू असलेल्या बचावकार्यानंतर सोमवारी (दि. २३) सकाळी सुमारे ९ वाजता उष्मतीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं. मात्र, या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रात्रभर चाललेल्या प्रयत्नांनंतरही उष्मतीचा जीव वाचू न शकल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मृत मुलीच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळणार

या घटनेनंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी गावित कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसेच शासनाच्या नियमानुसार मृत मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बोअरवेल गेल्या २० वर्षांपासून बंद असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. एवढ्या वर्षांपासून बंद असलेल्या बोअरवेलमध्ये चिमुकली नेमकी कशी पडली, याचा पोलिसांकडून तपास केला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बंद बोअरवेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे शेतांमधील बंद आणि वापरात नसलेल्या बोअरवेलच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. संबंधित बोअरवेलचं तोंड उघडं का होतं आणि तिच्या सुरक्षेसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

अवघ्या दीड वर्षांच्या उष्मतीच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली असून, या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी

Mumbai : पालिका सुरक्षा रामभरोसे; ४,०७६ मंजूर पदांपैकी २,३७९ रिक्त; अवघे १,६९७ सुरक्षारक्षक कार्यरत

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी

Ulhasnagar : उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी वृक्षांच्या अस्तित्वावर घाला! महापालिकेच्या कारभारावर पर्यावरणप्रेमींचा आक्षेप