महाराष्ट्र

सोनिया गांधी यांचा भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

देशात ध्रुवीकरण होतेय

वृत्तसंस्था

‘देशात ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण केले जात असून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबिरात शुक्रवारी केली. सोनिया गांधी यांनी यावेळी भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच पक्षात बदल गरजेचा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

राजस्थानातील उदयपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबीर शुक्रवारपासून सुरू झाले. यावेळी पक्षनेत्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ वेदनादायी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवणे, तसेच लोकांना नेहमी भीती आणि असुरक्षित स्थितीत राहण्यास भाग पाडणे आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करण्यात येत आहे.’’

पक्षात तातडीने बदल गरजेचा!

‘‘पक्षात तातडीने काही सुधारणा व बदल करणे गरजेचे आहे. असाधारण परिस्थितीत असाधारण कृती करण्याची गरज असते. पक्षाने आपल्या कार्यपध्दतीत बदल करायला हवा. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटनेला प्राधान्य द्यायला हवे. पक्षाने आपल्याला भरपूर काही दिले असून आता परतफेड करण्याची वेळ आली आहे,’’ असे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरात खुल्या मनाने चर्चा करून काँग्रेस ही एक मजबूत संघटना असल्याचा व ऐक्याचा संदेश आपण द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी शिबिरातील ४५० प्रतिनिधींना केले. तसेच आपल्या एकत्रित प्रयत्नानेच पक्षाचे पुनरुज्जीवन शक्य आहे व हे प्रयत्न या शिबिरापासून सुरू व्हायला हवेत, असे त्या म्हणाल्या.

या चिंतन शिबिराच्या निमित्ताने भाजप, आरएसएस आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे देशासमोर निर्माण झालेल्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचे यावेळी सोनिया गांधींनी नमूद केले. काँग्रेसचे चिंतन शिबीर १५ मेपर्यंत तीन दिवस चालणार आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. शुक्रवारी चिंतन शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना सोनिया गांधींनी राष्ट्रीय तसेच अर्थपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही संधी असल्याचे सांगितले.

काँग्रेसमध्ये आता एका कुटुंबात एकच

तिकीट, गांधी घराण्याला मात्र सूट

पुढील निवडणुकांपूर्वी तिकीट देण्याच्या बाबतीत काँग्रेसने मोठा फेरबदल करण्याची तयारी केली आहे. आता एका कुटुंबात एकच तिकीट मिळणार आहे. उदयपूर येथील चिंतन शिबिरात संघटनेत बदल आणि राजकीय बाबींवर समितीने ही शिफारस केली आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आमच्या पॅनलमध्ये एका कुटुंबात एक तिकीट हा फॉर्म्युला लागू करावा यावर चर्चा झाली आहे. ज्याला तिकीट दिले जाईल, त्याने किमान ५ वर्षे पक्षात काम केलेले असावे. थेट तिकीट देऊ नये. नवोदित नेत्यांना तिकीट मिळणार नाही, मात्र गांधी परिवाराला या नियमात सूट देण्यात आली आहे. हे सूत्र त्यांना लागू होणार नाही.

तीन वर्षांच्या कूलिंग

पीरियडनंतर दुसरे पद

सलग पाच वर्षे पक्षात काम केल्याशिवाय कोणालाही दुसरे पद देऊ नये, अशी शिफारसही समितीने केली आहे. किमान ३ वर्षांचा कूलिंग पीरियड असावा. पुढील कोणतेही पद तीन वर्षांच्या अंतरानंतरच दिले पाहिजे, असे माकन म्हणाले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत