कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
प्रवाशांकडून बसभाड्यातून स्वच्छता कर आधीच आकारला जात असल्याने आता हा खर्च महामंडळ स्वतः उचलणार आहे. यासाठी खासगी कंत्राटदारांकडून चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून ती जबाबदारी महामंडळाकडेच देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर तसेच स्थानिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
३० रुपयांत चहा-नाश्ता
दरम्यान, उपाहारगृहात गरजूंसाठी ३० रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना कागदावरच असल्याचे आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही योजना २४ तासांत सुरू करून त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश त्यांनी दिले, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी स्थानकातील विविध विभागांची पाहणी केली. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा किंवा प्रवाशांकडून बेकायदेशीर वसुली आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.