महाराष्ट्र

एसटीच्या गाड्या धावणार एलएनजीवर; देशातील पहिल्या LNG आधारित वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Swapnil S

मुंबई : डिझेलच्या दरात होणारी वाढ यावर उपाय म्हणून एसटीच्या बसेस आता एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) धावणार आहेत. देशातील पहिल्या एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्यात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, वैभव वाकोडे, मे. किंग्ज गॅस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद आझम कुरेशी आदी उपस्थित होते. यावेळी एलएनजी रूपांतरणामुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली आणि बसचे निरीक्षण केले.

९० आगारांत एलएनजी वितरण केंद्रे

राज्य शासनाच्या उद्योग विभागाने राज्यास एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी मे. किंग्स गॅस प्रा. लि. यांच्याबरोबर सामंजस्य करार केलेला असून, त्यामध्ये परिवहनसाठी सुद्धा एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. निश्चितच महामंडळाचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे. महामंडळाच्या सुमारे ९० आगारांत एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.

पाच हजार गाड्यांचे रूपांतर एलएनजीत

महामंडळाकडे डिझेलवर चालणारे सुमारे १६ हजार प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो. डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेलऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एसटीची वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहे. एसटीच्या पाच हजार डिझेल वाहनांचे एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतरण करण्यात येणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त