महाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू, पर्यवेक्षकांनाही महत्त्वाचा आदेश

शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना किंवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आली किंवा एसटी बसेस वेळेवर आली नाही किंवा अचानक रद्द करण्यात झाली तर विद्यार्थ्यांना योग्य मदत मिळण्यासाठी एसटी महामंडळाने हेल्पलाइन सुरू केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा, त्यांना कोणतीही अडचण आल्यास मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने नवी हेल्पलाईन सुरु केली आहे. शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना किंवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आली किंवा एसटी बसेस वेळेवर आली नाही किंवा अचानक रद्द करण्यात झाली तर विद्यार्थ्यांना योग्य मदत मिळण्यासाठी एसटी महामंडळाने हेल्पलाइन सुरू केली आहे.

मासिक पासमध्ये सवलत

राज्यभरातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस उपलब्ध असतात. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला ये-जा करण्यासाठी मासिक पासमध्ये ६६.६६ टक्के सवलत देतात. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. यासोबतच, आता १८०० २२१ २५१ या क्रमांकाची हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.

शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला शनिवारी (दि.२२) भेट दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अनेक समस्या व तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली.

संध्याकाळच्या वेळी शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर कमीत-कमी एक तासात मुले घरी जाणे अपेक्षित असते. पण, बसेस वेळेवर न आल्याने किंवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहचण्यास उशीर होत असल्याच्या समस्या यावेळी मांडण्यात आल्या.

...तर पर्यवेक्षक जबाबदार

या समस्या जाणून घेतल्यावर मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल."

पर्यवेक्षकांना महत्त्वाचा आदेश

पुढे ते म्हणाले, "सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत मुख्य बसस्थानक व ज्या ठिकाणी विद्यार्थी चढ-उतार जास्त होते, अशा थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेतील शेवटचा मुलगा किंवा मुलगी बसने सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून निघून जाऊ नये," असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

...तर अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल

शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केली तर जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस या गोष्टीला जबाबदार असणारे पर्यवेक्षक किंवा अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल किंवा सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले.

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

भारताकडे २५ दिवसांचा तेल साठा; केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती

Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात