(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

ऑडिओ, व्हिडीओ क्लिप सादर करा; नाना पटोले यांचे फडणवीसांना आव्हान

देशमुख यांचे ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप असतील तर ते सादर करत वस्तुस्थिती मांडा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांना दिले आहे.

Swapnil S

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ऑडिओ व व्हिडीओ क्लिप आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. देशमुख यांनी केलेले आरोप खरे की खोटे, हे जनतेसमोर आले पाहिजे. त्यामुळे देशमुख यांचे ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप असतील तर ते सादर करत वस्तुस्थिती मांडा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांना दिले आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्याविरोधात खोट्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणला होता, हे अनिल देशमुख यांनी जेलमधून जामीनावर बाहेर आल्यानंतरच सांगितले होते. मग देवेंद्र फडणवीस गप्प का बसले? देशमुख खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही. फडणवीस सरकार असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करत होते, ज्यांनी फोन टॅप केले त्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालकपदी बढती दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना न धमकवता वस्तुस्थिती मांडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

समित कदमला पोलीस सुरक्षा ही जनतेच्या पैशांची लूट

सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना गरज नसतानाही पोलीस सुरक्षा दिलेली आहे. समित कदम हा सरकार व व्यापारी यांच्यातील मध्यस्थ व्यक्ती आहे, म्हणून त्याला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे, ही जनतेच्या पैशाची लूट आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. खून, दरोडे, बलात्कार वाढले आहेत, त्याकडे गृह खाते व सरकारचे लक्ष नाही, पण आपल्या बगलबच्च्यांसाठी पोलीस दल तैनात ठेवले आहे, असा टोला पटोले यांनी लगावला.

उरणची घटना अत्यंत गंभीर, कठोर कारवाई करा!

नवी मुंबईतील उरणमध्ये एका मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली, ही घटना अत्यंत गंभीर आहे. राज्यात महिला असुरक्षित आहेत. मुंबई व आसपासच्या भागातच महिला सुरक्षित नाहीत तर राज्यातील इतर भागातील अवस्था काय असेल, त्याचा विचार करा. राज्यातून १५ हजारांपेक्षा जास्त मुली-महिला बेपत्ता आहेत. सत्तेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बसले आहेत, गुन्हेगारांना कशाचीही भीती राहिलेली नाही. उरण घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

असंवैधानिक सरकारच्या शेवटच्या घटका

राज्यात दोन वर्षा’पूर्वी जे सत्तांतर झाले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नव्हते. हे सत्तांतर करताना देवेंद्र फडणवीस वेश बदलून भेटी घेत होते हे, त्यांनीच सांगतिले आहे. आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तेच सांगितले. १० वेळा वेशांतर करून दिल्लीत भेटी घेतल्या, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. हे सरकार असंवैधानिक आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली असून ३ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रकरणाची सुनावणी होऊ शकते. या दोन्ही पक्षातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, असेही पटोले म्हणाले.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन