'हर हर महादेव' चित्रपटाचा वाद अजूनही संपलेला नाही. खासदार संभाजीराजे यांनी चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखविल्याचा आरोप केला होता. यानंतर हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर दाखवला जाणार असल्याने पुन्हा एकदा संभाजीराजे आक्रमक झाले. याचसंदर्भात, काही शिवभक्तांनी अभिनेता सुबोध भावेची कोल्हापूरमध्ये भेट घेतली. त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत त्याने मोठा निर्णय घेतला. तो म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराजांवरील माझे प्रेम आयुष्यभर राहील. पण, यापुढे मी कधीही ऐतिहासिक चित्रपटावर चरित्रपट करणार नाही.
शिवभक्तांशी केलेल्या चर्चेमध्ये सुबोध भावे म्हणाला, "महाराजांबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं, ते मी आयुष्यभर विसरणार नाही. पण यापुढे मी कधीही ऐतिहासिक चित्रपटात भूमिका करणार नाही. सध्या चित्रीकरण करता असलेला माझा शेवटचा चरित्रपट असेल." असे सांगत त्याने शिवभक्तांसमोर हात जोडले. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
"जर चित्रपट झीवर प्रक्षेपित केला, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि याला जबाबदार झी स्टुडिओ असेल." असा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता. तसेच, "छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. असे चित्रपट लोकांसमोर आणले जात आहेत. महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. इतिहासावर आधारित चित्रपट काढले जातात, ही चांगली गोष्ट आहे. पण, लोकांना आवडतात म्हणून विपर्यास करून असले चित्रपट काढू नका." अशी टीका त्यांनी केली होती.