मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्याचे निश्चित झाले असून त्यासाठी शनिवारी विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता विधानभवनात होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांच्या निवडीची औपचारिकता पार पाडली जाईल. नंतर लगेच संध्याकाळी ५ वाजता लोकभवन येथे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पतीच्या आकस्मिक मृत्यूनंतर एका अवघड प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
सुनेत्रा पवार यांना नेत्यांनी केली विनंती
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांना विधिमंडळ पक्षाचे नेतेपद स्वीकारण्याची विनंती केली होती. पक्षाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्यामुळे शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा निरोप सर्व आमदारांना देण्यात आला आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव मांडून त्यांची एकमताने पक्षनेते पदी निवड केली जाईल. या निवडीनंतर संध्याकाळी पाच वाजता लोकभवनात सुनेत्रा पवार यांचा साध्या पद्धतीने शपथविधी होईल. या शपथविधीला राष्ट्रवादीच्या नेत्यांसह भाजप, शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली चर्चा
दरम्यान, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी आज शुक्रवारी 'वर्षा' वर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेली वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती पक्षाकडे कायम राहावीत, याबाबत चर्चा केली. वित्त आणि नियोजन खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील, अशी चर्चा आहे. मात्र, वित्त आणि नियोजन खाते पक्षाकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी रिक्त असलेले हे मंत्रिपद भरण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचे समजते. याबाबत उद्याच स्पष्टता येईल.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाची निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणून सुनेत्रा पवार या लोकभवन येथे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरतील. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांना २०२४ ची लोकसभा बारामतीमधून लढवावी लागली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना एका पोटनिवडणुकीत राज्यसभेवर पाठवण्यात आले.
पार्थ पवार राज्यसभेवर?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांनी याआधी २०१४ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
विधिमंडळ नेता दादांच्या कुटुंबातीलच असावा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांचे बुधवारी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी तयारी सुरु केली आहे. पक्षाचा विधिमंडळ नेता हा दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबातीलच असावा, असा नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षनेता तथा उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आज आम्ही केलेली नाही, पण तो आमचा अंतर्गत विषय आहे. अजितदादांच्या जागेवर कोणाला बसवावे हा पक्षाचा निर्णय आहे. आम्ही जनभावना आणि आमदारांचे मत विचारात घेणार आहोत. लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. जनतेची भावना आणि सर्वांच्या भावनांच्या अनुरूप निर्णय होईल.प्रफुल्ल पटेल, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिक्त आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे. सुनेत्राताईंकडे पद देण्याची मागणी आहे आणि ती रास्त आहे.छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस