सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री Photo : X (Devendra Fadnavis)
महाराष्ट्र

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान

दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची शनिवारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर लोकभवन येथे साध्या पद्धतीने पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची शनिवारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर लोकभवन येथे साध्या पद्धतीने पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी तसेच पवार कुटुंबीयांपैकी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार उपस्थित होते. सुनेत्रा पवार शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर जाताना आणि शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उपस्थित आमदारांनी अजित पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. 'अमर रहे, अमर रहे, अजित पवार अमर रहे'. 'एकच वादा अजित दादा', 'महाराष्ट्राचा एकच वादा अजित दादा' आणि 'वहिनीसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देताना उपस्थित भावनिक झाले होते. 'वंदे मातरम'ने शपथविधी सोहळ्याची सांगता झाली.

राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा नाही

राज्यसभेवर खासदार असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लगेचच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाहीत. नियमातील तरतुदीनुसार त्या उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरी विधिमंडळाच्या सदस्य होईपर्यंत त्या राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहू शकतात. हा नियम लक्षात घेऊन पक्षानेही इतक्यात त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. बारामती पोटनिवडणूक निकालानंतर त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवारांकडे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याबाबत तसेच विधिमंडळ पक्षाचे सर्वाधिकार त्यांना देण्याबाबतचा ठराव मांडला. ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले आणि त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना दिले निवडीचे पत्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेल्या निवडीची माहिती देण्यासाठी आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आणि समीर भुजबळ उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना याबाबत अवगत केले आणि सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला.

सुनेत्रा पवार यांना मोदींकडून शुभेच्छा

दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील’.

राष्ट्रवादी प्रथमच अर्थखात्यविना

राज्याच्या सत्तेत असताना वित्त आणि नियोजन हे खाते आपल्याकडे कायम ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांच्या पश्चात अर्थ खाते राखण्यात अपयश आले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजितदादा यांच्याकडील खाती राष्ट्रवादीकडे कायम राहावीत, असा आग्रह धरला होता. मात्र, फडणवीस यांनी वित्त आणि नियोजन खाते राष्ट्रवादीला दिलेले नाही. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये १९९९ ते २०१४ अशी सलग १५ वर्षे अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे या नेत्यांनी आघाडी सरकारमध्ये अर्थ खात्याची धुरा वाहिली. २०१० मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून आले, त्यावेळी वित्त आणि नियोजन खाते अजित पवार यांच्याकडे आले. २०१९ महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही वित्त खाते राष्ट्रवादीकडे होते. २०२३ मध्ये अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन खाते मिळाले होते.

नव्या आशेने पुढे चालत राहीन - सुनेत्रा पवार

‘या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेने पुढे चालत राहीन’, असे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमातील पोस्टमध्ये म्हटले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.

शरद पवार, सुप्रिया सुळे अनुपस्थित

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे मात्र अनुपस्थित होत्या. शरद पवार यांनी शनिवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन आपल्यास या शपथविधीची कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या मातोश्रींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीस रवाना झाल्या. रविवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. आपल्याला तिथे उपस्थित राहायचे असल्याने आपण दिल्लीस जात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीने वित्त आणि नियोजन खाते गमावले

शपथविधीनंतर काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांची खाती जाहीर केली. त्यात राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन हे खाते गमवावे लागले आहे. वित्त आणि नियोजन खाते फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले. वित्त आणि नियोजन हे महत्त्वाचे खाते वगळून सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडील खाती देण्यात आली आहेत. सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्यांक आणि औकाफ ही खाती मिळाली आहेत. वित्त आणि नियोजन हे महत्त्वाचे खाते न मिळाल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

फेब्रुवारी महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना