

बंगळुरू : मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांवर क्षणभरही दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, याची जाणीव करून देणारी धक्कादायक घटना कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे घडली आहे. कपड्यांच्या खरेदीत आई-वडील व्यस्त असताना चार वर्षीय चिमुकली पहिल्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना चिकबल्लापूर शहरातील पिल्लप्पा कॉम्प्लेक्समध्ये घडली. चार वर्षीय गगन सिंधू ही आपल्या आई-वडिलांसोबत कपड्यांच्या खरेदीसाठी आली होती. खरेदी सुरू असताना आई-वडील दुकानात व्यस्त होते, तर चिमुकली पहिल्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये खेळत होती.
याच दरम्यान तिने सुरक्षा जाळीला (सेफ्टी ग्रिल) धरून उभे राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक तोल गेल्याने ती थेट तळमजल्यावर कोसळली. हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
प्रकृती गंभीर; बंगळुरूतील रुग्णालयात उपचार
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर तिला अधिक उपचारासाठी बंगळुरूतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
घटना CCTV मध्ये कैद, पोलिसांचा तपास सुरू
हा संपूर्ण प्रकार शॉपिंग कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून अपघात नेमका कसा घडला, याची माहिती मिळवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी पालकांनी सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील सुरक्षा जाळ्यांची उंची आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, लहान मुलांसोबत मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना क्षणभराचे दुर्लक्षही गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना सतत नजरेसमोर ठेवावे आणि रेलिंग, जिने किंवा उंच ठिकाणांजवळ त्यांना एकटे सोडू नये, असे आवाहनही या घटनेच्या निमित्ताने केले जात आहे.