

दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातील आशा किरण अपार्टमेंटमध्ये शनिवारी (दि. २७) अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अवघ्या चार ते पाच वर्षांच्या चिमुरडीचा दहाव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गृहसंकुलात शोककळा पसरली असून रहिवाशांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी दहाव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने तिच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. चिमुरडीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
नेमकी घटना कशी घडली?
ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध पोलीस घेत आहेत. चिमुरडी बाल्कनीतून खाली पडली, खिडकीतून कोसळली की अन्य कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून संबंधितांकडून माहिती घेतली जात आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
परिसरात हळहळ
अचानक घडलेल्या या घटनेमुळे आशा किरण अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. इतक्या लहान मुलीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेनंतर उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाल्कनी आणि खिडक्यांना सुरक्षित ग्रील बसवणे, लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे तसेच गृहसंकुलांनी आवश्यक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणात अपघात नेमका कसा घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.