मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आमदार सुरेश धस यांनी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे या तरुणाची हत्या झाल्याचे प्रकरण उपस्थित केले अणि या हत्येमधील एकही आरोपी अद्याप पकडला गेला नसल्याचे सांगितल्याने खळबळ माजली आहे. देशमुख यांची हत्या वगळता अन्य हत्या परळीत झालेल्या आहेत, परळीत ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सुरू आहे, असेही धस यांनी म्हटले आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत.
धस पुढे म्हणाले, परळीच्या तहसील कार्यालयाबाहेर महादेव मुंडे या तरुणाची हत्या झाली. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. ते ‘आका’चा मुलगा सुशील याच्यासोबत फिरतात. महादेव दत्तात्रय मुंडे या तरुणाचा खून झाला. या खुनातील एकही आरोपी अद्याप पकडला गेलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले आहेत. ते महाराष्ट्रात आल्यानंतर मी त्यांची भेट घेऊन यासंदर्भातील पत्र देणार आहे. तसेच करुणा मुंडे यांच्याबाबतचे पत्रही तयार केले आहे. गणेश मुंडे यांच्याबाबतचे पत्रही तयार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.
महादेव मुंडेच्या हत्येबाबत धस पुढे म्हणाले, महादेव मुंडेंची हत्या समोर आली तेव्हा त्यातले आरोपी कोण आहेत ते पण कळले. पोलीस निरीक्षक सानप हे आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. पण आकाने त्यांना पकडायचे नाही, असे आदेश दिले. राजाभाऊ फड आणि आमच्या पक्षात नसलेल्या पाच जणांना आरोपी करा, असे आकाने सांगितले. त्यावर सानप यांनी असमर्थता दर्शविल्यानंतर आकाने त्यांना परळीतून जायला सांगितले. त्यावर सानप यांनी मी निघून जातो असे सांगितले होते, असाही दावा सुरेश धस यांनी केला.
महादेव मुंडे कोण?
महादेव दत्तात्रय मुंडे हे मूळचे परळी तालुक्यातील भोपळा या गावाचे रहिवासी होते. २०२२ च्या आसपास ते अंबाजोगाई या ठिकाणी राहण्यास आले. २०२३ मध्ये आर्थिक व्यवहारातून त्यांची हत्या करण्यात आली. त्याबाबतचा उल्लेख आता सुरेश धस यांनी केला आहे. दरम्यान, बुधवारी सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचा उल्लेख केला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.