कोल्हापूर : महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्वयंसिध्दा या संस्थेच्या प्रमुख कांचनताई परुळेकर यांचे बुधवारी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या.
गेली काही वर्ष त्या कर्करोगाने आजारी होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. आज दुपारी त्यांचे निधन झाले.
ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे विद्यालयात त्यांनी एनसीसी अधिकारी म्हणून काम पाहिले. बी. एड. झाल्यानंतर त्यांनी विषय सोपे, आवडेल अशा पद्धतीने शिकवले. विद्यार्थिनींसाठी कमवा शिकवा योजनेचा पाया त्यांनी तयार केला. श्रमाला प्रतिष्ठा, कष्टाची सवय लागावी यासाठी त्यांनी या क्षेत्रात काम केले. अध्यापन काळातच त्यांनी विद्यार्थिनींसाठी ‘कमवा शिकावा’ योजनेचा पाया तयार केला. गरीब विद्यार्थिनींना आर्थिक मदत दिली जायची. १९९२ साली संस्थेच्या स्वरूपात काम सुरू करून ‘स्वयंसिद्धा’ नाव दिले.
व्रतस्थ समाजसेविका हरपली - मुख्यमंत्री
महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धा उपक्रमाद्वारे सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील अशी व्रतस्थ समाजसेविका हरपली, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, 'स्वयंसिद्धा'च्या संस्थापक संचालिका कांचनताई परुळेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.