कराड : किल्ले रायगडावरील टकमक टोक परिसरात ठाण्यातील ३७ वर्षीय सुयोग सुरेश पांचाळ बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला होता. रविवारी शोधमोहीमेदरम्यान दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
सुयोग पांचाळ हे मूळचे बीजघर, खेड (जि. रत्नागिरी) येथील असून सध्या ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहत होते. शनिवारी पहाटे ते कारने रायगडावर आले. कार पायथ्याशी उभी करून ते पायरी मार्गाने गडावर गेले. सकाळी साडेसातच्या सुमारास टकमक टोकावर पोहोचल्यानंतर त्यांनी पत्नीला संदेश आणि काही छायाचित्रे पाठविली, त्यानंतर मोबाईल बंद झाला.
बराच वेळ संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यांचे भाऊ सुवेल पांचाळ रायगडावर दाखल झाले. शनिवारी सायंकाळी महाड तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.
रविवारी पोलीस, एसव्हीआरएसएस रेस्क्यू पथक आणि स्थानिक नागरिकांनी पुन्हा शोध घेतला. ड्रोनच्या सहाय्याने दरीची पाहणी केल्यानंतर बचाव पथकाने दरीत उतरून सुयोग यांचा मृतदेह बाहेर काढला.