संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आठवडाभरात घोषणा? 'शिवतीर्थ' निवासस्थानी झाली पहिली बैठक; संजय राऊत, अनिल परबांची उपस्थिती

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सोमवारी घोषणा झाल्यानंतर मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी मनसे व ठाकरे गटाची युतीबाबत पहिली बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेतून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आठवड्याभरात घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसे-शिवसेना एकत्र येण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सोमवारी घोषणा झाली आणि मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी मनसे व ठाकरे गटाची युतीबाबत पहिली बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेतून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आठवड्याभरात घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब उपस्थित होते. मुंबई महापालिकेत चार दशकांहून अधिक काळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सत्तेचा उपभोग घेतला. परंतु २०२२ पासून निवडणुका लांबणीवर पडल्या आणि साडेतीन वर्षांनंतर आता पालिकेची निवडणूक होणार आहे. मात्र, एकमेकांपासून दुरावलेले राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे बंधू बदलत्या राजकीय परिस्थितीत पालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना ही लढाऊ संघटना बांधली. शिवसेनेने तब्बल चार दशके मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता राखली. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये बंड केल्याने शिवसेनेत फूट पडली. अनेक नेते, खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदेंसोबत गेले. या बंडानंतर मुंबई महापालिकेची पहिल्यांदाच निवडणूक जाहीर झाली आहे.

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून महापालिकेत सत्ता काबीज कर‌ण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर देखील चर्चा सुरू आहे. दादर येथील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत, अनिल परब यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक बैठक पार पडली. पुन्हा एकदा बैठक होऊन येत्या दोन दिवसांत युतीची घोषणा जाहीर केली जाईल. परंतु, जोपर्यंत अंतिम ठरत नाही, त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आठ दिवसांत युतीबाबत अधिकृतपणे शिक्कामोर्बत होणार असल्याचे स्पष्ट केले.

कॉंग्रेसला सोबत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. दोन्ही पक्षांच्या विचारसरणी वेगळ्या असल्याचे सांगत कॉंग्रेससोबत जाणार नसल्याचे संकेत मनसेने दिले, तर काँग्रेसबाबत आता काहीच ठरलेले नाही. या सगळ्या गोष्टींना अंतिम स्वरुप अद्याप आलेले नाही. कॉंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करू, असे शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब यांनी सांगितले. महाविकास आघाडीत शिवसेना कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व शिकवू नये - नांदगावकर

देशात हिंदुत्व सोडल्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. नांदगावकर यांनी यावरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. ठाकरे कुटुंबाला हिंदुत्वाबद्दल कोणी काही सांगू नये. बाळासाहेबांना हिंदुत्वासाठी सहा वर्षांची निवडणूक बंदी घालून मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. बाबरी मशीद पाडली तेव्हाही बाळासाहेबांनी स्पष्टपणे भूमिका मांडली होती. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला हिंदुत्वाबाबत कोणी शिकवू नये, असे नांदगावकर यांनी ठणकावले.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर