जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी आपली दहशत पसरवून जिल्हाभर अक्षरश: हैदोस घातला होता. नागरिकांची सातत्याने मागणी होत असतांना देखील प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नव्हती. मात्र महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनास वाळू माफीयांविरोधात कडक कारवाई करण्याबाबतचा दम भरताच प्रशासन पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आणि एकाच रात्रीतून ४ जेसीबी, १७ डम्पर, ६४ ट्रॅक्टर, ४५ दुचाकी जप्त करत १३ जणांना वाळू अवैध उपसाप्रकरणी अटक केली. प्रशासनाने केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून ही कारवाई एका दिवसापुरती नको, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात गिरणा, तापी व अन्य नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. गिरणा, तापीची वाळू ही औरंगाबाद, नाशिकपासून थेट मुंबईपर्यंत रवाना होत असल्याचे दिसून येत आहे. रात्री वाळू उपसा अथवा वाहतूक करण्याचा परवाना नसतांना देखील रात्रंदिवस वाळूचा उपसा होत आहे. वाळूच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली जाते.
शहरातून तसेच राष्ट्रीय महामार्गावरून रात्रंदिवस वाळूचे ट्रॅक्टर, डम्परची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत असतात. मात्र त्यांना रोखण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस,आरटीओ आणि महसूल यांनी ही कारवाई करणे अपेक्षित असतांना मनुष्यबहाचे कारण दाखवत आरटीओ कार्यालयाने यातून अंग काढून घेतली आहे. पोलीस विभागातील कर्मचारी वाळू व्यवसायात गुंतले असून त्यांचेच डम्पर, ट्रॅक्टर हे वाळू वाहतूक करत असल्याने पोलीस विभागाचा कानाडोळा होत होता. महसूल कर्मचारी, अधिकारी यांचे वाळू माफियांशी अर्थपूर्ण घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाल्याने महसूलकडून कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
गेल्या बुधवारी कालिका माता चौकात वाळूने भरलेला डम्पर भरधाव वेगात जात असतांना एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता तर दोन जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागरिकांनी रागाच्या भरात डम्पर पेटवून दिला होता, याप्रकरणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता.
कारवाईची धडक मोहीम सुरूच राहणार
अवैध वाळूविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत वाळू तस्करांचे ६४ ट्रॅक्टर , १७ डम्पर, चार जेसीबी , पाण्यातून वाळू काढणारे एक मशीन जप्त करण्यात आले. वाळूने भरलेले डम्पर व ट्रॅक्टर जात असतांना प्रशासनाचे कोणी आडवे येऊ नये यासाठी ४५ दुचाकी , ३ चारचाकी वाहने, तीन रिक्षा देखील जप्त करण्यात आल्या तर २१ जणांविरोधात १८ गुन्हे दाखल करण्यात येऊन १३ जणांना अटक करण्यात आली. वाळू वाहतूक व वाळू चोरी करणारी वाहने, चालकमालकां विरोधात कारवाईची धडक मोहीम ही सतत सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.