देवेंद्र फडणवीस, अमित शहा, एकनाथ शिंदे (डावीकडून) 
महाराष्ट्र

खलबते सुरूच! राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच; एकनाथ शिंदे नाराज? गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Maharashtra assembly election 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या भाजपप्रणीत महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून सध्या जोरदार खलबते सुरू आहेत. निकाल लागून तीन दिवस उलटले असले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा तिढा महायुतीला सोडवता आलेला नाही.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या भाजपप्रणीत महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून सध्या जोरदार खलबते सुरू आहेत. निकाल लागून तीन दिवस उलटले असले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा तिढा महायुतीला सोडवता आलेला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उत्सुक असले तरी राज्यातील हे सर्वोच्च पद भाजपकडेच राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे सध्या मुख्यमंत्रीपदावरून जोरदार खलबते सुरू असली तरी ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ हा निर्णय दिल्लीवरूनच येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचे समजत असून तेव्हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी तत्काळ आपापले विधिमंडळ नेते जाहीर केले. तरीही सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आपला विधिमंडळ पक्षनेता जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अद्यापही कायम ठेवला आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र भाजप हायकमांड मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा आणि छत्तीसगडप्रमाणे चर्चेत नसलेला चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवणार का? अशी जोरदार चर्चा आहे.

भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असतानाच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे येत होते. महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल, याचा निर्णय नवी दिल्लीतूनच होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते रात्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्यामुळे शिंदे यांना नाराज करता येणार नाही, अशी भूमिकाही भाजपच्या एका गोटातून मांडली जात आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आल्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले पाहिजे. कारण २६ तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागणार आहे. दरम्यान, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी २९ तारखेला होण्याची शक्यता आहे. आधी तीन जणांचे शपथविधी होतील आणि त्यानंतर इतर मंत्र्यांचे शपथविधी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेमुळेच महाराष्ट्रात महायुतीला सर्वात मोठा विजय मिळाला आहे. अपेक्षेपेक्षाही मोठे यश महायुतीला मिळाले. या यशाचे खंदे शिल्पकार असलेले एकनाथ शिंदे यांना नाराज करू नये, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी मांडली आहे. विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत चांगली कामगिरी करायची असल्यास शिंदे यांच्यासारखे नेतृत्व असलेले बरे, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. तर भाजपमधील मोठा वर्ग पुन्हा फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहे. कारण फडणवीस यांनी गेले सहा महिने भरपूर कष्ट करून पक्षाला हा मोठा विजय मिळवून दिला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले की, मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. हा निर्णय महायुतीतील मित्रपक्ष एकत्र बसून घेणार आहेत.

अमित शहा यांचा आज राज्यात दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ते निरीक्षक म्हणून येण्याची शक्यता आहे. कदाचित मंगळवारीच अमित शहा मुंबईत असतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ही नावे चर्चेत

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह तमाम भाजप नेत्यांची इच्छा असली तरी भाजपकडून विनोद तावडे यांच्यासह चंद्रकांत पाटील हेसुद्धा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. फडणवीस यांची मराठाविरोधी अशी प्रतिमा तयार झाल्यामुळे राज्याची कमान एखाद्या मराठा नेत्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याकडेही मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’?

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सध्या तरी आघाडीवर असले तरीही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे राज्यात बिहार पॅटर्न राबवणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. बिहारमध्ये भाजपकडे उपमुख्यमंत्री तर नितीश कुमार यांच्याकडे कमी जागा असूनही मुख्यमंत्रीपद दिले आहे. हाच फार्म्युला राबवला जावा, अशा चर्चा आहेत. पण, भाजपला मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात पक्षाचाच मुख्यमंत्री व्हावा, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे.

राज्य घटनेतून समाजवादी, धर्मनिरपेक्ष शब्द काढण्यास नकार; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या

शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे; विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव सुनील प्रभू प्रतोदपदी

लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या वेगवान गोलंदाजांचा बोलबाला; भुवनेश्वरसाठी बंगळुरूची १०.७५ कोटींची बोली, चहरसाठी मुंबईने मोजले ९.२५ कोटी

संभल हिंसाचार : सपा खासदार, आमदारपुत्र आरोपी; ७ एफआयआर नोंदविले; आतापर्यंत २५ जणांना अटक

अदानींची १०० कोटींची देणगी तेलंगणा सरकारने नाकारली