महाराष्ट्र

सोलापुरातही महायुतीत बिघाडी; धैर्यशील मोहिते-पाटील यांचा शरद पवार गटात आज प्रवेश

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली होती. ते मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांना उमेदवारी मिळाल्याने मोहिते-पाटील भाजपमध्ये दाखल झाले होते.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई -

सोलापूर जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा मोठा राजकीय प्रभाव आहे. आता त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्यांना माढ्याची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याच निमित्ताने अकलूजमध्ये सकाळी ११ वाजता मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत डिनर डिप्लोमसी होणार आहे. या राजकीय उलथापालथीमुळे सोलापूर आणि माढ्याचे गणित बिघडणार असून, महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली होती. ते मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांना उमेदवारी मिळाल्याने मोहिते-पाटील भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांची साथ मिळाल्यामुळे भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर निवडून आले होते. परंतु २०२४ च्या निवडणुकीसाठी मोहिते-पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. या विरोधाला न जुमानता भाजपने पहिल्याच यादीत निंबाळकरांचे नाव जाहीर केले. त्यामुळे मोहिते-पाटील गट नाराज झाला. धैर्यशील मोहिते-पाटील निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. त्यातूनच त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दि. १४ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होणार आहे. या निमित्ताने शरद पवार रविवारी अकलूज येथे शिवरत्नवर हजेरी लावणार आहेत.

या प्रवेशाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे सकाळी ११ वाजता डिनर डिप्लोमसीही आयोजित केली आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे समजते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे मैदानात आहेत. त्या पार्श्वभूमीवर या रणनीतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात विजयसिंह मोहिते-पाटील महाविकास आघाडीसोबत आल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, याचा जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत लाभ होणार आहे.


दुपारी ४ वाजता पक्षप्रवेश

धैर्यशील मोहिते-पाटील आणि मोहिते-पाटील कुटुंबातील इतर सदस्य रविवारी दुपारी ४ वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार नसल्याचे समजते. मात्र, १६ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते-पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले