आशिष शेलार,मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, उदय सामंत (डावीकडून) 
महाराष्ट्र

पालकमंत्रिपदासाठी आता रस्सीखेच; मुंबईसाठी भाजप व शिंदे गटाचा दावा; आगामी पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना झाला तरी राज्यातील महायुती सरकार अद्याप स्थिरस्थावर झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाहीर झाले, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना झाला तरी राज्यातील महायुती सरकार अद्याप स्थिरस्थावर झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाहीर झाले, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषत: मुंबई शहर व उपनगराच्या पालकमंत्रिपदासाठी शिंदे गट व भाजपकडून जोरदार दावा केला जात आहे.

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करण्यात येणार आहेत. पालकमंत्रिपद मिळावे यासाठी इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठीकडे फिल्डिंग लावली जात आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप व शिंदेंच्या शिवसेनेकडे मुंबई शहर व उपनगराचे पालकमंत्रिपद जाईल, असे सांगण्यात येते. मात्र, भाजपचे मंत्री आशिष शेलार यांना मुंबई शहराचे पालकमंत्रिपद हवे आहे, तर मुंबई उपनगराचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, उदय सामंत इच्छुक आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बराच रखडला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले तरी खातेवाटप झाले नाही. अखेर अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप जाहीर झाले. आता पालकमंत्रिपद मिळावे यासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील मंत्र्यांचे पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता महायुतीने मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यामुळे मुंबईशी संबंधित मंत्र्याला पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याबाबत महायुतीत चाचपणी सुरू असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

महायुतीच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. महायुतीकडून खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली आहे.

महायुतीत पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला आहे, तर अदिती तटकरे यांनीही रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी दावा केल्याचे सांगण्यात येते. बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

मुंबईसाठी अनुभवी चेहरा

विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्रिपद आपणास मिळावे, अशी इच्छा अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली असली तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी मुंबईशी निगडित अनुभवी चेहरा पालकमंत्रिपदी देण्याबाबत महायुतीत चर्चा सुरू असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

सोने-चांदी बाजारात मोठी घडामोड? अमेरिकी रोजगार आकडेवारी, इराणमधील तणावाचा परिणाम जाणवणार

Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

CJP Protest : ५ सप्टेंबरच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश

Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत