महाराष्ट्र

महाराष्ट्रातील खरी लढत वंचित आणि भाजपमध्येच; प्रकाश आंबेडकर यांचे विश्वास

येत्या १९ तारखेला महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यानच्या काळात वंचितवर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत अनेकांनी टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रात केवळ वंचितच लढा देण्यास सक्षम असून महाराष्ट्रातील लढाई ही वंचित आणि भाजपा यांच्यातच आहे, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे.

येत्या १९ तारखेला महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यानच्या काळात वंचितवर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत अनेकांनी टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे पत्र लिहिले आहे.

कार्यकर्त्यांच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडीत कामाबद्दल आभार मानत प्रकाश आंबेडकर पत्रात म्हणतात की, येत्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर येथील मतदार मतदान करून आपापले प्रतिनिधी निवडतील. या मतदारसंघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे. आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातील जागा वाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत. महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे. यामुळेच काँग्रेसलाही मतदारांमधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे स्वप्न

आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे, ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याची. हे केवळ आपले स्वप्न नाही; तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते; ते भैय्यासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मला माहिती आहे की, तुम्ही सर्वजण हे ७० वर्षांचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.

संयम गमावू नका

माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका. त्याचा सत्याने सामना करा आणि तुमचा संयम गमावू नका. खरे तर त्यांना आपल्या पक्षाची आणि वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटते, या गोष्टीचा तुम्हाला आनंद आणि गर्व वाटला पाहिजे. आपण पराक्रमी नसतो, तर त्यांनी लुटलेला पैसा आणि वेळ आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात खर्च केला असता का? नाही! खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हे दर्शवते. वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल याला ते घाबरत असल्याचे वास्तव आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी