मुंबई : राज्यातील निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. या निकालाची अपेक्षाच नव्हती. ही लाट नाही तर त्सुनामीच असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील एकूण आकडेवारी पाहिल्यानंतर या सरकारला एखादे बिल अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्याची आवश्यकताच नसल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षच ठेवायचा नाही, असा भाजपचा प्रयत्न दिसत आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजय अनपेक्षित आहे. तरीही जनतेला हा निकाल मान्य आहे का, जनतेला हा निकाल मान्य नसेल तर महाराष्ट्रासाठी आपण लढा देऊ, आम्ही जनतेच्या सोबत आहोत महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. निवडणुकीतील निकालावर टीका करत विजयी झालेल्या महायुतीला त्यांनी शुभेच्छा दिल्या. महायुतीत भाजपला मिळालेल्या जागा पाहता अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
भाजप महायुतीच्या बाजुने आलेला निकाल हा अनपेक्षित आहे. लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट असेल तर बाकीच्या गोष्टी उघड होत्या. सोयाबीनला भाव नाही, कापूस खरेदी नाही, महिला असुरक्षित, महागाई, बेरोजगारी अशा असंख्य गोष्टी आहेत. कोरोना काळात कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझे ऐकणारा महाराष्ट्र असे वागेल असे वाटत नाही. आजचा निकाल म्हणजे काही तरी गडबड आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
यांनी असे काय दिवे लावले की...
चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्यावेळी जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिली. मात्र, चार महिन्यांत असे काय यांनी दिवे लावले की एवढा निकालच बदलला, असा टोला त्यांनी लगावला.