पेण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एसटी स्टँड समोर असलेली विक्रम, मिनीडोअर, ईको स्टॅन्डची जागा कायमस्वरूपी स्टॅन्ड करिता द्यावी या मागणी करिता हजारो विक्रम, इको, मिनीडोअर चालक मालक विष्णूभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडकले.
एसटी स्टँड समोर विक्रम स्टँडचे भूखंड असल्याने ती जागा हडपण्याचे कारस्थान सत्याधिकाऱ्यांचे असून त्यांना ती जागा हडपु देणार नाही अशी गर्जना शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील यांनी केली. सर्वे नं. १०० हा भुखंड १९९४-९५ पासून टांगा (घोडागाडी) करीता आरक्षीत आहे. या जागी सध्याचा विक्रम मिनिडोअर, स्टँड आहे. सदरची जागा ही कायम स्वरुपी विक्रम, मिनीडोअर, इको स्टॅन्ड करिता आबादित राखण्यात यावी. शहरात सुमारे 800 विक्रम मिनिडोअर चालक आहेत. यातून सुमारे 30 हजार प्रवासी रोज प्रवास करतात. या सर्वांच्या सोयीची ती जागा आहे. केवळ आर्थिक लाभाकरिता विक्रम चालकांना विस्थापित करू नका अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा विष्णू पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी विक्रम स्टॅन्ड करिता भूखंड अबाधित ठेवण्याकरिता पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले.
सदर मोर्च्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, विक्रम मिनिडोअर चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, राजश्री घरत, मेघना चव्हाण, तालुका प्रमुख जगदीश ठाकुर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल, प्रवीण पाटील, शेकापक्षाचे डी.बी.पाटील, नगरसेवक संतोष पाटील, सोमेर पेणकर, तालुका संपर्कप्रमुख राजाराम पाटील, उपतालुका प्रमुख भगवान पाटील, संतोष पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, विभाग प्रमुख राजू पाटील, वाहतूक सेनेचे श्रीतेज कदम, दिलीप पाटील, अच्युत पाटील, शिवाजी म्हात्रे, युवा सेनेचे चेतन मोकल, विजय पाटील, ग्राहक संरक्षणचे नंदू मोकल, नरेश सोनवणे, गजानन मोकल, चंद्रहास म्हात्रे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व विक्रम चालक मालक त्यांचे कुटुंबीय व महिला वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते.
नगरपालिकेची भाजी मंडईत नगरपरिषदेचे ५९ गाळे व ३६ ओटे आहेत. या मधुन करोडो रुपयांचा डिपॉझिट व लाखो रुपयांचे वार्षिक भाडे नगरपरिषदेस उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहे. मात्र हे करोडोंचे प्राप्त होणारे उत्पन्न विक्रम, मिनिडोअर पार्किंगमुळे बुडीत जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकूण पार्किंगपैकी निम्मी जागा नगरपरिषद रिक्त करणार आहे. व उर्वरीत निम्मी जागा मिनिडोअर विक्रमच्या तात्पुरते पार्किंग करिता त्यांची पुढील पर्यायी व्यवस्था होईपर्यंत वापरास शिल्लक ठेवणार आहे. अन्य मिनीडोअर हायवे भिंतीलगत कोर्ट रस्त्याबाजून करणेचा पर्याय पेणचे प्रांत विठ्ठल इनामदार यांनी संघटने समवेत ५ वेळा बैठकी घेऊन दिला आहे. त्यामुळे तात्काळ विस्थापन करण्याचे धोरण नगरपरिषदेचे नाही.
जिवन पाटील, मुख्याधिकारी पेण नगरपरिषद