महाराष्ट्र

८१ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तिघांना अटक; दुय्यम निबंधकाचा समावेश

Swapnil S

नांदेड : शेतजमिनीच्या रजिस्ट्रीसाठी १ लाख ९९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधकास खासगी इसमाच्या हस्ते ८१ हजार ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने शुक्रवारी रात्री हदगाव (जि.नांदेड) येथे करण्यात आली. याप्रकरणी आरोपी दुय्यम निबंधक बालाजी शंकरराव उत्तरवार याच्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदारांनी हदगाव येथील गट क्रमांक २५६-२ मध्ये २० गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. शेतजमिनीच्या रजिस्ट्रीकरिता हदगाव येथील दुय्यम निबंधक उत्तरवार यांची भेट घेतली असता त्यांनी रजिस्ट्रीसाठी १ लाख ९९ हजार नोंदणी व मुद्रांक फीसह लाचेची मागणी केली. पण, तडजोडीअंती १ लाख ९५ हजार देण्याचे ठरले. ही रक्कम शेख समीउल्ला अजमतउल्ला यांच्याकडे देण्याचे सांगितले.

याप्रकरणी तक्रारदाराने नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून लाचेची पडताळणी केली असता समीउल्ला यांनी १ लाख ९५ हजारांची लाच उपनिबंधक कार्यालय आवारात स्वीकारून आरोपी शेख अबूबकर याच्याजवळ दिली. त्यानंतर नोंदणी व मुद्रांक फी भरल्याची १ लाख १३ हजार ४०० रुपयांची पावती देण्यात आली. उत्तरवार यांनी नोंदणी व मुद्रांक फीच्या नावाखाली ८१ हजार ६०० रुपयांची लाच समीउल्ला यांच्याद्वारे स्वीकारली.

याप्रकरणी दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवार, मुद्रांक विक्रेता समीउल्ला अजमतउल्ला शेख ऊर्फ शमी व मुद्रांक विक्रेता शेख अबूबकर करीम सिद्दीकी ऊर्फ बाबू या तीनही आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर रात्री उशिरा हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या पथकाने केली.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?