Pune : वाघाचा बछडा मानवी वस्तीत सापडला; वन विभागाकडून विशेष पिंजऱ्यात रवानगी 
महाराष्ट्र

Pune : वाघाचा बछडा मानवी वस्तीत सापडला; वन विभागाकडून विशेष पिंजऱ्यात रवानगी

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावच्या गोरडेमळा परिसरात मंगळवारी सकाळी वाघाचा सुमारे तीन महिन्यांचा बछडा थेट मानवी वस्तीत आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Swapnil S

रांजणी : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावच्या गोरडेमळा परिसरात मंगळवारी सकाळी वाघाचा सुमारे तीन महिन्यांचा बछडा थेट मानवी वस्तीत आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे बछड्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

गोरडेमळा येथील रहिवासी बाळासाहेब पांडुरंग गोरडे यांच्या घरासमोरील शेडमध्ये सकाळी त्यांच्या पत्नी यांना हा बछडा दिसला. त्यांनी तातडीने दूरध्वनीद्वारे बाळासाहेब गोरडे यांना माहिती दिली. त्यानंतर गोरडे तसेच उपसरपंच हिरामन गोरडे यांनी गावातील वन्यजीव बचाव कार्यात कार्यरत असलेले दत्ता राजगुरू व शारदा राजगुरू यांच्याशी संपर्क साधला तसेच तत्काळ वन विभागालाही सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दत्ता राजगुरू व शारदा राजगुरू यांच्या सहकार्याने बछड्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

वन विभागाने प्राथमिक पाहणीनंतर बछड्याची आई जवळपासच्या परिसरात असण्याची शक्यता लक्षात घेऊन बछड्याला घरालगतच्या उसाच्या शेतात विशेष पिंजऱ्यामध्ये ठेवले आहे. मादी वाघीण आपल्या बछड्याला परत घेऊन जाते का, यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेराही बसविण्यात आला आहे. वन विभागाचे कर्मचारी परिसरावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

वन्यप्राण्यांना त्रास नको

या घटनेमुळे शिंगवे व परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे तसेच परिसरात वावरताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच बछडा किंवा अन्य वन्यप्राणी दिसल्यास त्याला त्रास न देता तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय