मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवत मंत्रालयातील प्रत्येक विभागाची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. यानुसार गुरुवारी मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. विशेष म्हणजे ‘बेस्ट’ उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची चार दिवसांपूर्वी नियुक्ती केली होती, मात्र त्यांनी पदभार स्वीकारण्याआधीच त्यांची सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या फडणवीस प्रत्येक विभागाच्या बैठका घेत कामाचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात खांदेपालट करत गुरुवारी दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाचे प्रमुख म्हणून बदली केली, तर त्यांच्या जागी विनायक निपूण यांची नेमणूक केली आहे.
जितेंद्र डुड्डी पुण्याचे जिल्हाधिकारी
जितेंद्र डुड्डी यांची पुणे जिल्हाधिकारी, तर सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची वन विभागातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात बदली केली आहे, तर आय. ए. कुंदन यांच्याकडे कामगार विभागाचा कारभार सोपवला आहे. विनिता वेद सिंगल यांच्याकडे पर्यावरण विभागाचा कार्यभार दिला आहे, तर विकासचंद रस्तोगी यांना कृषी विभागाचे प्रधान सचिव पदावर नियुक्त केले आहे. जयश्री भोज यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कारभार सोपवला आहे.