Nashik : त्र्यंबकेश्वरला अडीच हजारांत ‘ब्रेक दर्शन’ योजना; आठ मिनिटांत होणार दर्शन (Photo-@nativeplanet)
महाराष्ट्र

Nashik : त्र्यंबकेश्वरला अडीच हजारांत ‘ब्रेक दर्शन’ योजना; आठ मिनिटांत होणार दर्शन

भाविकांची वाढती गर्दी आणि दर्शन तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून ‘ब्रेक दर्शन’ योजना सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Swapnil S

त्र्यंबकेश्वर : भाविकांची वाढती गर्दी आणि दर्शन तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून ‘ब्रेक दर्शन’ योजना सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेंतर्गत अडीच हजार रुपये शुल्क भरून भाविकांना अवघ्या आठ मिनिटांत दर्शन घेता येणार आहे. लवकरच ही योजना सुरु होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली.

या सुविधेचा लाभ दररोज ५०० भाविकांना मिळणार असून, यासाठी स्वतंत्र काऊंटर उभारण्यात येणार आहे. तसेच या दर्शनार्थींसाठी विशेष ओळख व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

सध्या मंदिरात मोफत धर्मदर्शन आणि २०० रुपयांच्या देणगी दर्शनासाठी स्वतंत्र रांगा आहेत. मात्र, मुख्य मंदिराजवळ दोन्ही रांगांचा संगम होत असल्याने मोठी गर्दी आणि विलंब होत असतो. नव्या ‘ब्रेक दर्शन’ योजनेत अडीच हजार रुपयांचे तिकीट घेतलेल्या भाविकांसाठी ही रांग काही काळ थांबवून त्यांना थेट दर्शनाची संधी दिली जाणार आहे.

यासाठी सुमारे पाच मिनिटांचा ‘ब्रेक’ दिला जाईल आणि भाविक दर्शन घेऊन आठ मिनिटांच्या आत बाहेर पडेल, अशी व्यवस्था प्रस्तावित आहे.

देवस्थान ट्रस्टकडून ही योजना लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी २०० रुपयांचे देणगी दर्शन पूर्ववत सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रत्यक्षात ही योजना कशा पद्धतीने राबवली जाते आणि त्याचा सर्वसामान्य भाविकांवर काय परिणाम होतो, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

त्र्यंबकेश्वर हे देशातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वरला आहे. ते पाहण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे या शहरात भक्तांची गर्दी वाढणार आहे.

८६ हजार कोटी थकले; राज्य सरकारविरुद्ध कंत्राटदार आक्रमक, आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन

सोनियांविरुध्द भाजपचे काहूर; ’वंदे मातरम्‘चा अपमान केल्याचा आरोप, काँग्रेसने माफी मागावी - शहांची मागणी

Mumbai : मेट्रो वनचा डिजिटल पास WhatsApp वर; गुगल वॉलेट, ॲपल वॉलेटमध्येही करता येणार साठवण

हा तर सरकार उलथवण्याचा कट!

आजचे राशिभविष्य, १७ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत