नंजय कवठेकर / रायगड
उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीच्या तुळजाई नावाच्या मासेमारी करणाऱ्या बोटीला खांदेरी किल्ल्यानजीकच्या समुद्रात कलंडून जलसमाधी मिळाली. या बोटीतील आठ जणांपैकी पाच जण सुखरूप असून तीन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
करंजा येथून तुळजाई मासेमारी बोट सकाळी मासेमारीसाठी जिल्हा प्रशासनाने मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता. तरी देखील भर पावसात लाटांचा मारा सहन करीत कारंजा येथील मनोहर कोळी यांची तुळजाई नावाची बोट मासेमारीसाठी समुद्रात झेपावली होती.
मुसळधार पावसासह लाटांचा मारा या बोटीला सहन झाला नाही. यामुळे तुळजाई मासेमारी बोट खांदेरी किल्ला परिसरातील समुद्रात कलंडली. आणि या बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीमध्ये नाखवासह सात जण असे एकूण आठ जण होते. बोट बुडणार असल्याचे लक्षात येताच बोटीवरील आठही जणांनी समुद्रात उद्या घेतल्या. आठ जणांपैकी पाच जण पोहत बाहेर आलेले आहेत. ते किरकोळ जखमी आहेत.