शिर्डीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन; नाराज छगन भुजबळांची बळेबळेच हजेरी संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

शिर्डीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन; नाराज छगन भुजबळांची बळेबळेच हजेरी

पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीवरून आपण अधिवेशनाला हजर राहिलो याचा अर्थ सर्व प्रश्न सुटले असा होत नाही, असे सूचक विधान भुजबळ यांनी केले

Swapnil S

शिर्डी : राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी अखेर शिर्डीतील दोन दिवसांच्या पक्षाच्या अधिवेशनाला बळे बळेच हजेरी लावली. पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीवरून आपण अधिवेशनाला हजर राहिलो याचा अर्थ सर्व प्रश्न सुटले असा होत नाही, असे सूचक विधान भुजबळ यांनी केले आणि नाराजी कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

भुजबळ यांनी स्पष्ट केले की, पक्षनेते प्रफुल्ल पटेल यांनी दोन तास माझी भेट घेतली आणि शिर्डी अधिवेशनाला उपस्थित राहण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मला दूरध्वनी केला आणि शिर्डीला येण्याची विनंती केली. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या विनंतीवर या बैठकीला आपण हजेरी लावली आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की सर्व प्रश्न मिटले आहेत. ही पक्षाची बैठक आहे, कोणत्याही एका व्यक्तीची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री भुजबळ यांनी मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी न लागल्याने अजित पवार यांना दोष दिला होता. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनाला उपस्थित न राहताही निषेध व्यक्त केला होता. जहां नहीं चैना, वहां नहीं रहना, असेही भुजबळ म्हणाले होते. त्यामुळे ते वेगळा राजकीय मार्ग स्वीकारणार का, अशी चर्चा होती. भुजबळ यांची पक्ष बैठकीतील उपस्थिती आणि त्यांचे निवेदन पक्षात अंतर्गत वाद असल्याचे अधोरेखित करतात. त्यामुळे त्यांचे आगामी राजकीय पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सतीश चव्हाण परतले!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी विधान परिषदेचे सदस्य सतीश चव्हाण परतले आहेत. त्यांनी काही काळ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घालवला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये अजित पवार गटाने त्यांना पक्षविरोधी कारवायांसाठी सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर चव्हाण हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटात गेले होते. परंतु पक्षाने निलंबन रद्द केल्यानंतर चव्हाण यांनी पुन्हा अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि इतर नेत्यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गाफील राहू नका - तटकरे

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली असल्याने आता गाफील राहू नका, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले. ते म्हणाले की, पक्षाची विचारधारा व दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आता आपल्याला नव्या दिशेने मार्गक्रमणा करण्याची गरज आहे. पक्ष अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

नृशंस हत्यांचा कळस अन् बेदरकार नेतन्याहू

भाषा मरता देशही मरतो...

आजचे राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत