उद्धव-राज २० वर्षानंतर एकत्र; शिवसेना-मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब! मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले 
महाराष्ट्र

उद्धव-राज २० वर्षानंतर एकत्र; शिवसेना-मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब! मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी तब्बल वीस वर्षानंतर एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप-शिंदे सेना विरुद्ध दोन ठाकरे सेना असा सामना रंगणार आहे.

Swapnil S

मुंबई : मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी तब्बल वीस वर्षानंतर एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप-शिंदे सेना विरुद्ध दोन ठाकरे सेना असा सामना रंगणार आहे.

उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध व्यासपीठावर एकत्र येत होते. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांची युती होणार याची अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. आता राज्यात मनपा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसेने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सीमध्ये झालेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना-मनसे युतीची घोषणा केली.

केंद्र, राज्यात असलेल्या सत्तेच्या पाठबळाच्या जोरावर मुंबईसह महाराष्ट्रात भाजप-शिंदे सेनेने सर्वच पक्षांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. नुकत्याच झालेल्या नगर पंचायत-नगर परिषद निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेने स्वतंत्रपणे लढवूनही राज्यात बहुमत मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आता भाजप, शिंदेंच्या बुलडोझर ताकदीचा मुकाबला करणे एकट्याचे काम नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेना (उबाठा) व मनसेने एकत्र येत आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या युतीवर बुधवारी शिक्कामोर्तब केले. यावेळी खासदार संजय राऊत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, चंदू मामा यांच्यासह दोन्ही सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युतीची घोषणा होताच, शिवसैनिक मनसैनिकांनी दोन्ही ठाकरेंचा एकच जयघोष केला.

महापौर होणार आमचाच!

मुंबईचे लचके तोडायचे मनसुबे दिल्लीतल्या दोघांचे आहेत. त्यामुळे आता भांडत राहिलो तर मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान ठरेल. यासाठी कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असा निर्धार ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

युतीची घोषणा होण्यापूर्वी दोन्ही कुटुंबांची राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट झाली. उद्धव आणि राज यांना यावेळी ओवाळण्यात आले. त्यानंतर दोन्ही बंधूंनी कुटुंबासहित शिवाजीपार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन नतमस्तक झाले. तेथून ठाकरे बंधू पत्रकार परिषदेसाठी दाखल झाले.

मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. सत्यनारायणाची पूजा करून मुंबई मिळालेली नाही. यासाठी तीव्र संघर्ष केला आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्या योगदानाची आठवण करून दिली. आज पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडायचे मनसुबे दिल्लीतल्या दोघांचे आहेत, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आता आम्ही आपण भांडत राहिलो, तर मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाचा अपमान असेल. त्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. यापुढे मुंबईवर आणि महाराष्ट्रावर कुणी ही वाकड्या नजरेने किंवा कपटी कारस्थानांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आता फुटाल तर संपून जाल!

दरम्यान, सर्व मराठी जनांना सांगतो, आता जर चुकाल, तर संपाल. आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका, असे जाहीर आवाहन केले.

मुंबई, नाशिकात युती

उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि नाशिकची युती ठरली असून अन्य महापालिकांबाबत नंतर सांगण्यात येईल, असे स्पष्ट केले. तर राज ठाकरे यांनी तूर्त मुंबई महापालिकेची युती जाहीर केली आहे. जशा अन्य महापालिकांचे ठरेल तसे सांगितले जाईल, असे सांगितले.

राज ठाकरे यांचा निशाणा

मला जे बोलायचे आहे ते जाहीर सभांमधून बोलेन हे सांगताना त्यांनी युतीची चर्चा ज्या मुलाखतीपासून सुरू झाली, त्याची आठवण करून देताना कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुले पळवतात, असे सांगताना त्यांनी भाजप आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधला. यावेळी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे!

मनसे-शिवसेना युतीला मत म्हणजे मुस्लीमधार्जिण्या राजकारणाला मत अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ फिरतोय, ज्यात ते अल्लाह हाफिज बोलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वावरून काही बोलू नये, असा टोला राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. माझ्याकडे मुख्यमंत्र्यांच्या खूप ध्वनिचित्रफिती आहेत. त्यामुळे ते आता काय काय बोलतात, त्यानुसार माझे व्हिडिओ तयार असतील, असा सूचत इशाराही त्यांनी दिला.

ही तर अस्तित्त्व टिकविण्यासाठीची धडपड -देवेंद्र फडणवीस

राज आणि उद्धव एकत्र आले आहेत याचा मला आनंद आहे. पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काहीतरी घडेल असा जर कुणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. माझ्यासमोर टीव्ही सुरु होता म्हणून बघत होतो. काही माध्यमं असं दाखवत होती रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. झेलेन्स्की निघाले, पुतिन निघाले आणि युती झाली. मला वाटतं कुठल्याही पक्षाला अस्तित्व टिकवण्यासाठी जे करायचं असतं ते त्यांनी केलं. याने फार काही परिणाम होईल असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आता कोंबडी खाण्यासाठी आले - एकनाथ शिंदे

लोकशाहीत युती आणि आघाड्या होत असतात. कोणाची युती कोणा बरोबर झाली तरी महायुती मजबूत आहे. मात्र काही युत्या सत्ता व स्वार्थासाठी व आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी होत असतात. तसेच काही लोक मुंबईला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून बघतात. आधी अंडी खात होते आता कोंबडी खाण्यासाठी एकत्र आले आहेत, असा जोरदार प्रहार शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

शिवसेना मनसे युतीला शुभेच्छा - सपकाळ

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या  युतीला सदिच्छा व शुभेच्छा आहेत, आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली पण मुंबई मनपाच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यानुसार पक्षाने निर्णय घेतला आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही पक्षाची भूमिका जाहीर केली. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश मोठं आहे. महायुतीने साम, दाम, दंड, भेद नितीचा खुलेआम वापर केला, सोबतीला प्रशासन व निवडणूक आयोग होता, तरीही काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने व निष्ठेने लढला. अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो त्याचा फायदा काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत झाला, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच - वडेट्टीवार

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती. मात्र मनसे बाबत जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. विधान सभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती.पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही. आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात यातून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला अस मानण्याचे कारण नाही, असे ही काँग्रेस विजय वडेट्टीवार म्हणाले.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Iran Israel War : जहाजांचा युद्ध विमा महाग; संघर्षामुळे अतिरिक्त प्रीमियम भरावा लागणार; विमा कंपन्यांचा निर्णय