परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी परभणी येथील सभेत बोलताना आपल्या पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांना तातडीने अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. हे बंड म्हणजे एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याच्या षडयंत्राचा भाग आहे असा दावाही त्यांनी केला.
'ऑपरेशन देवेंद्र' असे या मोहिमेचे वर्णन करून ठाकरे म्हणाले की. २०२९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हे सर्व चालले आहे. यापूर्वी मध्य प्रदेश जिंकून देणारे शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांचे पंख असेच कापले गेले होते. आता फडणवीस बलिष्ठ होऊ नयेत म्हणून भाजपपेक्षा शिंदे गटाचे अधिक खासदार होऊ दिले गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
सहा खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे यांनी सध्या त्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. शनिवारी ते यवतमाळ व वाशीममध्ये होते. रविवारी त्यांनी धाराशिव व परभणीचा दौरा केला आणि तेथील फुटिरांवर जोरदार टीका केली.
शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या सहा खासदारांना कायद्याने अपात्र ठरवले पाहिजे. यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली असून, कायद्याचे राज्य राखले जाईल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. "आम्ही अध्यक्षांच्या अधिकारांचा आदर करतो, पण त्यांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे," असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान आपण कोणत्याही स्थितीत उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही अशी ग्वाही धाराशिवच्या सभेत आमदार कैलास पाटील यांनी दिली. तर ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या वडिलांच्या भ्रष्टाचाराची चौकशी लागेल या भीतीनेच शिंदे गटात प्रवेश केला असावा असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले- मला पंखच नाहीत
उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला जाणाऱ्या विमानातून एकत्र प्रवास केला. त्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला परवा विमानात भेटले. त्यावेळी ते हतबल दिसत होते. त्यांना कळत होतं पंख आपलेच बॉस कापतात. दरम्यान, याविषयी पत्रकारांनी छेडले असता फडणवीस म्हणाले, मला कुठले पंखच नाही, तर कोण माझे पंख कोण छाटणार. माझ्यामागे महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांचा आणि माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाकरे व आपण शेजारी शेजारी बसलो नव्हतो. असा खुलासा करून फडणवीस म्हणाले की, बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. पण आम्ही निव्वळ एका विमानात होतो यावरून किती राजकीय चर्चा चालू आहे!!