संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सरकारला सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा; दिवाळीनंतर पुन्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ते शेतकऱ्यांच्या सोबतीत आहेत आणि त्यांच्या विश्वासाला कधीही तडा येऊ देणार नाहीत. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पक्ष प्रत्येक पावलावर न्याय मिळवून देण्यासाठी सोबत राहील. तसेच, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Swapnil S

मुंबई : शेतकऱ्यांचा मी सोबती असून शेतकऱ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे कुणी उभे राहो न राहो, परंतु शिवसेना त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावरती न्याय मिळवून देण्यासाठी सोबत आहे, असा शब्द देतानाच जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत सरकारला सोडायचे नाही, असा इशारा, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहल शेख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना नेते अंबादास दानवे, नेते चंद्रकांत खैरे, उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, छत्रपती संभाजीनगर महानगरप्रमुख राजू वैद्य तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज दिवाळीचा पहिला दिवस असून दिवाळीच्या शुभेच्छा देताना मला मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकरी दिसत आहे. आठ दिवसांपूर्वी मराठवाड्यात आलो होतो. तेव्हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला होतो की, जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचे नाही. कारण सध्याचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. खरडून गेलेल्या जमिनीला त्यांनी हेक्टरी तीन-साडे तीन लाख रुपये जाहीर केले. त्यावेळी म्हटले होते की, मदत हवी तर दिवाळीनंतर करा, यातील एक लाख दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका. मात्र, सरकारने तसे केले नाही. तसेच कर्जाचे पुनर्गठण नाही तर कर्ज पूर्ण माफ करा, ही आपली मागणी आहे. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या चिंधड्या उडायला लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातात जेमतेम पैसे येऊ लागले आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

मी मुंबईत असलो तरी माझा अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आदी नेत्यांशी संपर्क सुरू असतो. तिकडे काय चालले आहे याची मला संपूर्ण माहिती मिळते. मी तिकडे पुन्हा दिवाळीनंतर येणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मराठवाडा, महाराष्ट्राने या सरकारचा अनुभव घेतलेला आहे. या सरकारला आपल्याला घालवायचे आहेच, पण सर्वप्रथम संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मैदानात उतरू या, असे आवाहन ठाकरे यांनी केले. दिवाळीनंतर मराठवाड्यात येणार असलो तरी तालुका पातळीवर शिवसेनेची पथके नेमली पाहिजेत. सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे, ते शेतकऱ्याला मिळते की नाही, हे पाहिले पाहिजे. शेतकऱ्याला ते मिळवून देण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, अशा सूचना ठाकरे यांनी केल्या.

महायुती सरकार शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाने शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर आपण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. हे सरकार शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करण्यात कुचराई करत आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मला या प्रकरणी राजकारण करायचे नाही. पण या सरकारची शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याचे मला दिसते, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. शुक्रवारपासून दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र १८०० कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. सरकारने जी मदत दिली आहे, त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे. त्यामुळे ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी ठरणार आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू