मुंबई : एकनिष्ठ शिवसैनिक पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने उद्धव ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे. त्यात खासदारही सेनेची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना राजापूर विधानसभा मतदारसंघातील कट्टर शिवसैनिक राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी, पक्षात नेमके काय सुरू आहे, खासदार, आमदारांच्या मनात नेमके काय याची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची २० फेब्रुवारीला, तर आमदारांची २५ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली आहे.
ज्यांना जायचय त्यांनी जा, कट्टर शिवसैनिक बरोबर असून शिवसेना भक्कम उभी आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील नेत्या राजुल पटेल यांनी ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला. तर काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू आहे.
पक्षातील खासदार, आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने उद्धव ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे. पक्षाला सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदारांची बैठक बोलावली आहे. तसेच विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक होणार आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चित करण्यासाठी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.