मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. वायकर यांच्यासोबत जोगेश्वरी येथील त्यांच्या अनेक समर्थक शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी देखील ‘वर्षा’ या मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या अनेक दिवसांपासून वायकर हे शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर रविवारी वायकर यांनी ‘मशाल’ सोडून ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. विशेष म्हणजे, शनिवारीच उद्धव ठाकरे यांचा वायकर यांनी सत्कार केला होता. वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या अतिशय निकटवर्तीय वर्तुळातील मानले जातात. त्यांचा शिंदे गटात प्रवेश हा लोकसभा निवडणुकांआधी उद्धव ठाकरे यांना बसलेला आणखीन मोठा धक्का मानला जात आहे. मतदारसंघातील विकासकामे वेगाने व्हावीत यासाठी आपण हा पक्षप्रवेश करत असल्याचे वायकर म्हणाले.
ईडी चौकशीबाबत विचारले असता, ज्या चौकशी यंत्रणा आहेत त्यांना मी पूर्ण सहकार्य आजपर्यंत दिले आहे. त्याचे ‘दूध का दूध पानी का पानी’ होईलच. मी निधीबाबत न्यायालयात देखील गेलो होतो. सत्तेत असलात तर निधी जास्त मिळतो, असेही वायकर म्हणाले.
आता संभ्रम दूर झाले - मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि महायुतीच्या माध्यमातून राज्यात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यावर विश्वास ठेवून वायकर आमच्याकडे आले आहेत. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण त्यांच्या पाठिशी राहू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी वायकर यांना दिला. वायकर आणि माझ्यात आधी काही संभ्रम होते. पण ते आता पूर्णपणे दूर झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.