विविध देशातील राजदूतांचे संभाजीनगरात आगमन; बीबी का मकबरा, वेरुळ येथील बुद्ध लेणी विशेष भेट 
महाराष्ट्र

विविध देशातील राजदूतांचे संभाजीनगरात आगमन; बीबी का मकबरा, वेरुळ येथील बुद्ध लेणी विशेष भेट

युनेस्कोच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी संध्याकाळी विविध देशांतील सांस्कृतिक राजदूतांचे विमानाने शहरात आगमन झाले. त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. लोकनृत्यासह ब्राझीलच्या कलाकारांनी केलेल्या म्युरल पेंटिंगचेही त्यांनी कौतुक केले.

Swapnil S

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

युनेस्कोच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी संध्याकाळी विविध देशांतील सांस्कृतिक राजदूतांचे विमानाने शहरात आगमन झाले. त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. लोकनृत्यासह ब्राझीलच्या कलाकारांनी केलेल्या म्युरल पेंटिंगचेही त्यांनी कौतुक केले. पुढील तीन दिवसांच्या दौऱ्यात हे प्रतिनिधी वेरूळ व अजिंठा लेणीला भेट देऊन सायंकाळी ७ वाजता लेणी क्र.१६ कैलास लेणी उत्सवात सहभागी झाले.

शुक्रवारी ही मान्यवर मंडळी दिल्ली व मुंबईवरून विमानाने छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली. तीन दिवसीय कार्यक्रमात जागतिक कला, वारसा आणि नावीन्य यांचा संगम पाहायला मिळणार आहे. 'ऐक्यम' ही संकल्पना विज्ञान आणि अध्यात्म, मानवता आणि निसर्ग तसेच भारताच्या प्राचीन श्रद्धांच्या एकतेच्या तत्त्वज्ञानावर आधारित असल्याचे आयोजकांनी सांगितले. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे महाराष्ट्रीय तसेच इतर देशांच्या चवीला साजेसा बहुरंगी मेजवानीचा आस्वाद त्यांना देण्यात आला.

ब्राझीलचे आर्टिस्ट सेरिगो कोर्डेइरो यांच्या भित्तीचित्र पेंटिंगचा राजदूतांनी आनंद घेतला. याशिवाय लोककलेचे सादरीकरणही करण्यात आले. शहरातील केंद्रीय मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरण करून अतिथींचे स्वागत केले.

यावेळी राजदूतांनी पूरणपोळी, मोदक, मिसळ पाव, खिचडी, पुलाव, शेवगा कचोरी, मेथी, पनीर, बटाटा, पांढरा रस्सा, काळा रस्सा, मसालेभात, तसेच नॉन-व्हेजमध्ये नान-खलिया, भरली वांगी यांसारख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. युनेस्को, महाराष्ट्र पर्यटन आणि छत्रपती संभाजीनगर शहर यांच्या सहकार्याने सोपान या कला-संस्कृती उपक्रमांतर्गत ऐक्यम २०२५ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकार गौरी शर्मा त्रिपाठी यांनी दिग्दर्शित केलेला 'ओमकार बॅले' हा शास्त्रीय नृत्यप्रकार सादर होणार आहे.

विविध देशातील कलाकारांचा समावेश

यासह विविध लोकनृत्यांचे सादरीकरण होणार असून अर्जेंटिना, इटली, लिथुआनिया, नेदरलँड्स, पेरू, पोलंड आणि स्पेनमधील कलाकारांचा सहभाग असेल. विशेष चर्चासत्रात युनेस्को भारत प्रादेशिक कार्यालयाचे संचालक डॉ. टिमोथी कर्टिस, लेखक-इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल आणि सांस्कृतिक भाष्यकार निक बूकर सहभागी होणार आहेत. तसेच ब्राझीलचे कलाकार सर्जिओ कॉर्डेइरो हे अजिंठा भित्तीचित्रांचे समकालीन सादरीकरण करणारे थेट भित्तीचित्र साकारतील. याशिवाय प्रतिनिधी विविध पर्यटनस्थळांना भेट देतील.

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा