मुंबई : माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विरोधात राज्यभर आंदोलन सुरू करण्याची घोषणा सोमवारी केली.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात, वंचित बहुजन आघाडी ३ डिसेंबरपासून निवडणुकीत ईव्हीएमचा वापर थांबवण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करणार असून आंदोलन १६ डिसेंबरपर्यंत कायम ठेवेल, असे पक्षाने जाहीर केले आहे.आघाडीने ईव्हीएमविरोधी आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १० दिवसांनी झाली. निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने बहुमतासह विजय मिळवला असून शपथविधी ५ डिसेंबरला होत आहे. वंचित बहुजन आघाडीला २० नोव्हेंबरच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.