जालना/मालेगाव/ तारकर्ली : राज्याच्या विविध भागात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ११ जणांचा बळी गेला असून तिघेजण बचावले आहेत. महाड-पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय आला. या घाटात शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी बसला अपघात झाला. यातून ६० विद्यार्थी बचावले. तर सिंधुदुर्गात तारकर्लीच्या समुद्रात पाच पर्यटक बुडाले असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यासाठी शनिवार हा घातवार ठरला.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पत्र्याच्या शेडखाली मजूर झोपले होते. शनिवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास ट्रकद्वारे या शेडवर वाळू रिकामी करण्यात आली. याखाली झोपलेले सात मजूर दबले गेले. यातील ५ मजुरांचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात यश आले. हे मजूर जळगाव आणि संभाजीनगरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कळताच पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि वाळू बाजूला करून मजुरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना दोघांना वाचविण्यात यश आले.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असताना ही घटना घडली. पोलिसांनी या दुर्घटनेची चौकशी सुरू केली. या दुर्दैवी घटनेत गणेश काशिनाथ धनवई (वय ४०), भूषण गणेश धनवई (वय १६) या बापलेकासह सुनील समाधान सपकाळ (वय २०) आणि अन्य दोन जणांचा मृत्यू झाला.
तारकर्लीत पाच पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू
समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. किनाऱ्यावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यावसायिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा शोध धेण्यात आला. मात्र रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) या दोघांचा मृत्यू झाला. ओंकार भोसले या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे या प्रकरणी तपास करत आहेत.
बस पलटी होताना वाचली; विद्यार्थी सुखरूप
पोलादपूर-महाडजवळच्या आंबेनळी घाटात शनिवारी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या एसटी बसला अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून ६० विद्यार्थी सुखरूपपणे बचावले आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेली एसटी बस प्रतापगड ते महाबळेश्वरकडे निघाली होती. यातून ६० विद्यार्थी प्रवास करत होते. वाडा कुंभारोशी जवळ एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला कलली. चाके मातीच्या ढिगाऱ्यात रुतून बसल्याने बस पलटी होता होता वाचली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र भीती पसरली होती.
ट्रक रिक्षावर पडून मालेगावात ३ ठार
मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावजवळ दरेगाव येथे भीषण अपघात झाला. मालवाहू ट्रक विरुद्ध बाजूने जाताना उलटून प्रवासी रिक्षावर पडला. या दुर्घटनेत रिक्षातील ३ प्रवासी ठार झाले असून सात जण जखमी झाले. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रिक्षाचालक, दोन महिला प्रवाशांचा समावेश आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक हटवण्याचे काम केले. महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारा मालवाहू ट्रक अचानक विरुद्ध बाजूने आला आणि नियंत्रण सुटल्याने पलटी झाला.
चांदवडमध्ये ट्रकने वाहनांना चिरडले, महिला ठार
चांदवडजवळील अपघातात राहुड घाट येथे ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. त्यात एका महिला ठार झाली तर पाच जण जखमी झाले. प्राथमिक अंदाजानुसार, उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाले. या ट्रकने सात ते आठ वाहनांना धडक दिली. यात कार व ट्रकचा समावेश होता.