महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ; एका तासाला सरासरी ३५० वाहनांची नोंद

एका तासाला सरासरी ३५० वाहने मुंबई-गोवा महामार्गावरून गेल्याचे दिसून आले आहे. या दरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून पोलिसांनी चांगलीच कंबर कसली होती.

Swapnil S

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांना घेऊन निघालेल्या विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ अत्यंत वेगवान असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र जिल्हा पोलिसांच्या नियोजनामुळे यावर्षी कुठेही वाहतूककोंडीचा सामना गणेशभक्तांना करावा लागला नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या या वाहनांची नोंद पोलिसांच्या डायरीत केली जात आहे. एका तासाला सरासरी ३५० वाहने मुंबई-गोवा महामार्गावरून गेल्याचे दिसून आले आहे. या दरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून पोलिसांनी चांगलीच कंबर कसली होती.

महामार्गावरून गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलिसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. या नोंदीनुसार मागील तीन दिवसांत चार लाख गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून या सरासरी वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने कोकणाच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसून आले. जेवणाकरिता चाकरमानी महामार्गावर ठिकठिकाणी थांबल्यामुळे दुपारच्या वेळेत सरासरी वाहन प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र चार वाजल्यापासून गाड्यांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली होती. गेल्या दोन दिवसांत ४ हजार ५०० एसटी व खासगी बसेसमधून साधारण १ लाख ३ हजार २४ चाकरमानी कोकणात रवाना झाले. बसेस व्यतिरिक्त खासगी कार, टेम्पो आदी सुमारे १ लाख ५५ हजार वाहने कोकणात रवाना झाली आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर या प्रमुख जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आपल्या कोकणातील गावी निघाले होते. त्यामुळे महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूककोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील १६३ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०० पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले होत. तर अवजड वाहनांची बंदी आदेश मोडणाऱ्या ३५ अवजड वाहनांवर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे.

- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक.

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

२९ पैकी १५ ठिकाणी महिला महापौर; महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा लिस्ट

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

Republic Day Alert: '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी