चंद्रपूर : काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमध्ये २०० कोटींची जागा अवघ्या ३ कोटींमध्ये लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांचे आरोप सरनाईक यांनी साफ धुडकावून लावले आहेत.
या राज्यात घोटाळ्यांची मोठी मालिका सुरू झाली आहे. सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्थेसाठी मीरा-भाईंदरमधील मोक्याच्या ठिकाणची ४ एकर जमीन ज्याची किंमत बाजारमूल्याप्रमाणे २०० कोटी रुपये आहे, ती अवघ्या ३ कोटी रुपयांमध्ये घेतली आहे. मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का आणि जर हे होऊ शकते, तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो, तुम्ही लुटा, असे म्हणायची वेळ आता आली आहे, असे वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे पत्रकारांना सांगितले. यासंदर्भात मी उद्या सविस्तर माहिती देणार आहे, सर्व्हेनंबरसह माहिती देतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान,महसूल मंत्री बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर भाष्य केले आहे. बावनकुळे म्हणाले, वडेट्टीवार कोणत्या प्रकरणासंदर्भात बोलत आहेत, जर त्यांनी माझ्याकडे तक्रार दिली, तर त्याची चौकशी होईल. हे लोक केवळ माध्यमांमध्ये बोलतात. प्रश्न असा आहे की, तक्रार द्यायला हवी, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल, असेही ते म्हणाले.