Solapur : वारकरी झाले भावभक्तीत चिंब! बाजीराव विहिरीजवळ नेत्रसुखद रिंगण (Photo-Facebook)
महाराष्ट्र

Solapur : वारकरी झाले भावभक्तीत चिंब! बाजीराव विहिरीजवळ नेत्रसुखद रिंगण

आषाढी यात्रेसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण गुरुवारी सायंकाळी सहा वाजता बाजीराव विहिरीजवळ रंगले.

सूर्यकांत आसबे

सूर्यकांत आसबे/सोलापूर

आषाढी यात्रेसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण गुरुवारी सायंकाळी सहा वाजता बाजीराव विहिरीजवळ रंगले. वारकरी आनंदाने विठू नामाच्या जयघोषात नृत्य करण्यात दंग झाले. बाजीराव विहिरीजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलावरून भाविकांनी रिंगण सोहळ्याचा अगदी डोळेभरून आनंद घेतला. या रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर पायी आलेल्या वारकऱ्यांचा क्षीण कुठच्या कुठे निघून गेला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यसह देशाच्या विविध भागातून संतांच्या पालख्या वाखरीत दखल झाल्या. दुपारी भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीसाठी निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणासाठी बाजीराव विहीरसमोर आला. उड्डाणपुलाच्या शेजारी सर्व्हिस रस्त्यालगत दुपारी लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी अलोट गर्दी केली होती. रिंगण पाहण्यासाठी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले.

सायंकाळी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ -मृदंगाच्या तालावर खांद्यावर पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या भोवतीने गोल रिंगण घातले. त्यानंतर मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वाराने रिंगणाला सुरुवात केली. अश्वानी रिंगणातील फेऱ्या पूर्ण करून रिंगण पूर्ण केले. रिंगण पूर्ण होताच अश्वाच्या टापाची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.

विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण बाजीराव विहिरीजवळ मोठया भक्तीमय वातावरणात पार पडले. लाखो विठ्ठल भक्तांनी यावेळी माउली माऊलींचा एकच जयघोष केला होता.

पालखी सोहळे आज पंढरीत

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले. यानंतर सायंकाळी पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ येथे विसावला. शुक्रवारी वाखरी येथून दुपारी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर आल्याने भाविक पांडुरंगाचा जयघोष करत आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील; FDA ची कारवाई, १५ दिवसांसाठी परवाना रद्द 

ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्राचे शिक्षणच घेतले नाही; ईडीसमोर भोंदूबाबा खरातची कबुली

Mumbai : पालिका सभागृहातही पडसाद! ‘मोदी हाय हाय, विद्यार्थ्यांना न्याय द्या’; महापालिकेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

CJP Protest : आज देशव्यापी आंदोलन; शांततापूर्ण सहभागाचे कॉकरोच पार्टीचे आवाहन

NEET Paper Leak : पूर्वीच्या पेपरफुटीतील आरोपीविरुद्ध पुरावे नाहीत - CBI