महाराष्ट्र

पुण्यातील पाणी टंचाईचे संकट टळले

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या चार तालुक्यांसाठी उन्हाळी आवर्तन चार मार्चपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला

Swapnil S

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात यंदा पाणीसाठा कमी असूनही सध्या पुण्यात पाणी कपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने शनिवारी घेतला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या चार तालुक्यांसाठी उन्हाळी आवर्तन चार मार्चपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसह जिल्ह्यातील मतदारांची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नसल्यानेच पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

विविध प्रकल्पांच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात शनिवारी झाली. त्यावेळी पुणे महापालिकेला पाणी कपातीसाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या आहेत.

आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, रवींद्र धंगेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते. त्यावेळी ‘महानगरपालिकेने पाणी बचत करून जलसंपदा विभागाने दौंड, इंदापूरला सिंचनासह पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार भरणे, कुल यांनी केली.

१५ जुलैपर्यत पाणी राखीव ठेवा

खडकवासला प्रकल्पात १६.१७ टीएमसी पाणी उपलब्ध असून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी १४.९८ टीएमसी उपलब्ध होत आहे. त्यातून सिंचनासाठी ६.९८ टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. चार मार्चपासून पहिले उन्हाळी सिंचनासाठीचे आवर्तन ४५ दिवसांचे सोडण्यात येणार असून दुसरे आवर्तन हे दौंड नगरपालिका आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे. त्याशिवाय पुणे शहर जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणीसाठ्यातून १५ जुलैपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश