महाराष्ट्र

शरद पवारांनी सहकार क्षेत्रासाठी काय केले? अमित शहा यांचा हल्लाबोल

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मालेगावमधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

Swapnil S

नाशिक : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मालेगावमधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. शरद पवार १० वर्षे केंद्रीय कृषिमंत्री होते, त्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी आणि सहकार क्षेत्रासाठी काय केले त्याचा महाराष्ट्राला हिशोब द्यावा, असे आव्हान शहा यांनी दिले.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते. यावेळी त्यांनी संस्थेच्या काजू प्रक्रिया युनिट आणि माती तपासणी प्रयोगशाळेचे उद‌्घाटन केले. या कार्यक्रमात अमित शहा यांनी सहकार क्षेत्रावरून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना लक्ष्य केले.

यावेळी सहकार क्षेत्राबाबात शहा म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील सहकार क्षेत्रातील लोक, सहकार मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करायचे, त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. सहकार ही आत्मनिर्भरतेची सर्वात सुंदर व्याख्या आहे, असेही शहा म्हणाले. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा ४६ हजार कोटी रुपये कर कमी करण्याचे काम आमच्या सरकारने केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या करावरून वाद होत होते. पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने हा प्रश्न सोडवला. आज मी या व्यासपीठावरून पवार साहेबांना विचारू इच्छितो की, तुम्ही दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री होता. त्यावेळी सहकार क्षेत्र कृषी मंत्रालयांतर्गत होते. तेव्हा तुम्ही सहकार क्षेत्रासाठी, साखर कारखान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा हिशोब तुम्ही महाराष्ट्राला द्यायला हवा. पवार साहेब नेता होण्यासाठी फक्त मार्केटिंग पुरेसे नाही. त्यासाठी तळागाळात काम कारावे लागते. मी इथे आज राजकारण करण्यासाठी आलो नाही. पण, सहकार मंत्रालयाची स्थापना आणि साखर कारखान्यांच्या कराच्या प्रश्नांसारख्या समस्या नरेंद्र मोदी यांनीच सोडवल्या आहेत, असे ते म्हणाले.

लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला, नरेंद्र मोदी यांनी ‘जय विज्ञान’चा नारा दिला. सहकाराच्या माध्यमातून चालवले गेले तर शेतीमध्ये निश्चित फायदा होतो. शेतकरी परंपरागत शेती करतो, अत्याधुनिक भूमी परीक्षण प्रयोगशाळा इथे तयार करण्यात आली आहे. पाण्याची पीए मात्रा किती आहे याचा अभ्यासदेखील याठिकाणी केला जातो आहे. १५०० गिर गाई आहेत, त्यातून सगळ्या प्रकारची उत्पादने तयार होतील. यामुळे ऑर्गनिक शेतीची सुरुवात देखील होईल. ऑर्गनिक लॅबोरेटरी सुरू करा, भारत सरकार तुम्हाला मदत करेल असे मी शिवाजीराव यांना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

सहकार मंत्रालयाने ऑर्गनिक को-ऑपरेटिव्ह लिमिटेड तयार केले आहे. या माध्यमातून येणारा फायदा थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जाणार आहे. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ही संस्था देणार आहे. आत्मनिर्भरतेची सर्वात सुंदर व्याख्या सहकार आहे. त्यामुळे मोदींनी सहकार ते समृद्धी असा नारा दिला आहे. या संस्थेत एक लाखांहून अधिक सदस्य आहेत इथे अत्यंत सुंदर ड्रिप व्यवस्था आहे, ८० टक्के शेती इथे ड्रिपद्वारे होते, असे शहा म्हणाले.

दरम्यान, मालेगावातील या कार्यक्रमासाठी अमित शहा यांच्यासह केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

मालेगाव येथील कार्यक्रमासाठी छगन भुजबळ देखील उपस्थित होते. अमित शहा हे या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यावर त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे बघितले. यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांना बोलावून आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाददेखील झाला. अमित शहा यांच्या या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत भुजबळ म्हणाले की, शहा यांचा मोठेपणा आहे, मी लांब बसलो होतो. पण त्यांनी जवळ बसवून घेतले. राजकारणावर काही चर्चा झालेली नाही. यानंतर दिल्लीला जाणार का, अमित शहा यांनी आपल्याला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, दिल्ली देशाची राजधानी आहे. तुम्ही, आम्ही कधीही दिल्लीला जाऊ शकतो, असे भुजबळ यांनी सांगितले.

शहांनी केले भुजबळांना जवळ

राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्याने ते कमालीचे नाराज झाले असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यातच शुक्रवारी मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भुजबळ यांना पाहताच आपल्या जवळ बोलाविले आणि त्यांना शेजारच्या खुर्चीवर बसविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार?

फडणवीस यांची झालेली भेट आणि अजित पवारांबद्दल उघडपणे व्यक्त केलेली तीव्र नाराजी यावरून भाजपच्या कोट्यातील मंत्रिपद मिळावे, यासाठी छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चां आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

‘ऑक्टोबर हिट’ने मुंबईकर घामाघूम! तापमान ३२; पण भास ४१चा... सोशल मीडियावर भावनांचा भडका