नवी दिल्ली : राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला, त्याचे खापर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर फोडले. त्यास प्रत्युत्तर देताना चंद्रचूड यांनी सवाल केला की, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यांची सुनावणी घ्यावयाची याचा निर्णय एक पक्ष घेणार का?
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रचूड यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ‘जवळपास वर्षभर आम्ही घटनात्मक प्राथमिक खटले, नऊ सदस्यांच्या पीठाचा निर्णय, सात सदस्यांच्या पीठाचे निर्णय, पाच सदस्यांच्या पीठाचे निर्णय यामध्ये व्यस्त होतो. आता सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यांची सुनावणी घ्यावयाची याचा निर्णय एक पक्ष घेणार का, असा सवाल चंद्रचूड यांनी केला आणि हा अधिकार सरन्यायाधीशांचा असतो, असे स्पष्ट केले.
संजय राऊत काय म्हणाले?
आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्याबाबत चंद्रचूड यांनी निर्णय घेतला नाही आणि राजकीय नेत्यांच्या मनातून कायद्याची भीती काढून टाकली. त्यामुळे राजकीय पक्षांतरासाठीचे दरवाजे खुले राहिले आणि त्यातून महाविकास आघाडीचा पराभव झाला, असा आरोप राऊत यांनी केला होता.