महिला आरक्षणावरून कलगीतुरा; आरक्षणाच्या समर्थनार्थ १ कोटी सह्या गोळा करणार: मुख्यमंत्री फडणवीस; खुल्या चर्चेस काँग्रेस तयार: प्रणिती शिंदे 
महाराष्ट्र

महिला आरक्षणावरून कलगीतुरा; आरक्षणाच्या समर्थनार्थ १ कोटी सह्या गोळा करणार: मुख्यमंत्री फडणवीस; खुल्या चर्चेस काँग्रेस तयार: प्रणिती शिंदे

महिला आरक्षणाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेने फेटाळल्यानंतर राज्यात या मुद्द्यावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सोमवारी कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणावर काँग्रेसला खुल्या चर्चेचे आव्हान दिले.

Swapnil S

मुंबई : महिला आरक्षणाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेने फेटाळल्यानंतर राज्यात या मुद्द्यावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सोमवारी कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणावर काँग्रेसला खुल्या चर्चेचे आव्हान दिले. याशिवाय महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ जनमत संघटित करण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यासाठी महाराष्ट्रातील एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर काँग्रेसने महिला आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपचे खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षणाची अंमलबाजवणी का झाली नाही? असा सवाल केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षणाच्या प्रश्नावर महायुतीच्या नेत्यांसह पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षाच्या आघाडीवर जोरदार टीका केली. जगभरातील लोकशाहीत आज महिलांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी भारतात मात्र महिलांची संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून लोकशाहीतील महिलांच्या सहभागाची हत्या झाली आहे. त्याचे हत्यारे हे सर्व विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे आम्ही महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ तालुका पातळीपर्यंत जनजागृती करू. काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उबाठा पक्ष यांचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघडा पाडू . जनमताचा असा रेटा होईल की मुकाटयाने या सर्वांना महिला आरक्षण विधेयकाला समर्थन द्यावे लागेल. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.

विरोधकांनी ७० कोटी महिलांचा केला विश्वासघात

महिला आरक्षणाला विरोध करणे ही काँग्रेसची आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची नेहमीच मानसिकता राहिली आहे. त्यामुळे विरोधकांनी आरशात पाहिले पाहिजे. त्यांना त्यांचे महिला विरोधी चेहरे दिसतील. विरोधी पक्षाने ७० कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या केली. महिलांचे अधिकार हिरावून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न निषेधार्थ आहे. लोकशाहीत महिलांचा सहभाग रोखून विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केला आहे. असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. विरोधी पक्षांकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी त्यांना खुले आव्हान देतो, माझ्या स्तरातल्या त्यांच्या कुठल्याही नेत्याने माझ्यासोबत महिला विधेयकावर खुली चर्चा करावी, पण ते करणार नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायची, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान मोदींनाही खुल्या चर्चेला आणा

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते, असा आरोप काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी सोमवारी केला. सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे. त्यांनी कधी आणि कुठे यायचे ते सांगावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिले.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता