महाराष्ट्र

दौंडमधील यवतमध्ये दोन गटात धुमश्चक्री; आक्षेपार्ह पोस्टनंतर दगडफेक, जाळपोळ

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटात शुक्रवारी मोठा राडा झाला. दोन्ही गट आमनेसामने येऊन मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड झाल्याने या भागात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटात शुक्रवारी मोठा राडा झाला. दोन्ही गट आमनेसामने येऊन मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड झाल्याने या भागात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, येथील परिस्थिती पोलिसांच्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावर दौंड तालुक्यात यवत गाव आहे. येथील एका मुस्लिम तरुणाने सोशल मीडिया ग्रुपवर केलेली आक्षेपार्ह पोस्ट गावातील वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे. ही पोस्ट मध्य प्रदेशात घडलेल्या एका घटनेबाबत होती. संबंधित तरुण मूळचा नांदेडचा असून, तो गवंड्याचे काम करत असल्याचे सांगण्यात येते.

तीन दिवसांपूर्वी यवत गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्यामुळे गावकरी संतप्त झाले होते. या मूर्ती विटंबनेनंतर दोन दिवसांनी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची ‘हिंदू आक्रोश मोर्चा' नावाची सभा यवतमध्ये झाली होती. या सभेच्या दुसऱ्या दिवशी या मुस्लिम तरुणाने व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ग्रामस्थ आणि तरुण अधिक आक्रमक झाले. त्यातून दोन गट समोरासमोर आले व धुमश्चक्री झाली. यामध्ये गावातील एक घर, एक बेकरी आणि दोन गाड्या जाळण्यात आल्या. जमावाने काही तरुणांना मारहाण केल्याचेही समोर आले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका - अजितदादा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचे शांतता राखण्याचे आवाहन

सभा झाली म्हणून आम्ही असे केले, असे कोणी म्हणत असेल, तर हे सहन केले जाणार नाही. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्माचे पालन करणाऱ्यांवर टीका करण्याचा कुणालाही अधिकार नाही. लोकांनी शांतता राखावी व कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पोलिसांचा हवेत गोळीबार

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पावले उचलली. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आणि हवेत गोळीबार करून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा यवतमध्ये दाखल झाला. पुण्यातूनदेखील अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. शांतता राखण्यासाठी यवतमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले. जे ४८ तासांसाठी लागू राहील.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल