यवतमाळ : नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ३ हजार वर्षे जुन्या संस्कृतीचे आणि त्या काळातील घरांचे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे. हे अवशेष लोहयुगातील असल्याचे त्यांचे मत आहे.
नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाच्या संशोधकांनी २०२३-२४ मध्ये बाबुळगाव तालुक्यातील पाचखेड गावात उत्खनन केले, अशी माहिती या विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाष साहू यांनी दिली.
पाचखेड गावाच्या बाहेर मातीचा ढिगारा सापडला. त्याचे खोदकाम केल्यानंतर ८.७३ मीटर खोलीवर पुरातन वस्तू सापडल्या. आम्ही या ठेव्याला चार कालखंडात विभागले आहे. त्यापैकी एक काळ हा लोहयुगाचा आहे. आम्ही त्याचे उपवर्गीकरण केले आहे. हे पुरातन नमुने नवी दिल्लीतील ‘इंटर युनिर्व्हसिटी ॲॅक्सलेटर सेंटर’ला पाठवले आहेत. हे केंद्र या वस्तूंचा कालावधी निश्चित करते. याबाबतचा तपशील मे-जूनपर्यंत कळल्यानंतर त्याचा निश्चित क्रम लावता येऊ शकेल, असे ते म्हणाले.
सापडलेले अवशेष लोहयुगातील ?
सापडलेली मातीची भांडी आणि कलाकृतींच्या अवशेषांवरून लोहयुगापासून शोधांचा सांस्कृतिक क्रम सुरू होतो. त्यानंतर सातवाहन काळ, मध्ययुगीन काळ आणि नंतर ते (ज्या ठिकाणी सापडले आहे) निजाम काळात ‘वॉच टॉवर’ म्हणून वापरले जात होते. मातीची चूल, भांडी, लोखंडी वस्तू, अर्ध-मौल्यवान दगडांचे मणी, टेराकोटा मणी आणि हाडांच्या वस्तू येथे सापडल्या. या सर्व वस्तू अंदाजे ३ हजार वर्षांपूर्वीच्या म्हणजेच लोहयुगातील असाव्यात, असा दावा साहू यांनी केला.