मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा येथे थांबलेल्या लोकलच्या मोटरमन केबीनमध्ये तरुणाने घुसखोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणांनी सोशल मीडियावर रिल्स टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर जागे झालेल्या मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने दोन्ही तरुणांना नाशिक येथून ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मीडियावर स्टंट, लोकल, मेल/एक्स्प्रेसमधील डान्सचे व्हिडीओ प्रसारित करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न तरुण तरुणींकडून केला जातो. मात्र ही कृती जीवावर बेतू शकते, याचा विचार स्टार्सकडून होताना दिसत नाही. लोकलमधून स्टंट करताना झालेल्या अपघातात एका तरुणास एक पाय आणि एक हात गमवावा लागल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते.
घटनेनंतर २५ जुलै रोजी कसारा स्थानकात फलाट क्रमांक ४ वर उभ्या असलेल्या लोकलच्या मोटरमन केबीनमध्ये एका तरुणाने प्रवेश केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाने व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो व्हिडीओ तरुणांनी समाज माध्यमावर प्रसारित केला.
व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर आरपीएफ पथकाने सायबर सेलच्या सहकार्याने दोघांना नाशिक येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले.