मुंबई

हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत ११ टक्के मृत्यू; मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांचे वाढते प्रमाण

Swapnil S

मुंबई : हृदयरोग हे जगभरात मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २०२३ च्या जन्म-मृत्यू नोंदणी व मृत्यूच्या कारणांच्या अहवालानुसार, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये एकूण मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३० वर्षांवरील व्यक्तींचे आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यासाठी ऑगस्ट २०२२ पासून २६ रुग्णालयांमध्ये ‘विशेष रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र’ सुरू केली आहेत. यात, ऑगस्ट २०२४ पर्यंत ४ लाख ५ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ९.०५ टक्के रक्तदाबाचे, तर १२.३३ टक्के मधुमेहाचे संशयित रुग्ण आढळले आहेत.

त्याचप्रमाणे, सर्व विभागांमध्ये घरोघरी लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण अंतर्गत मागील दीड वर्षात ३० वर्षांवरील नागरिकांमध्ये एकूण २१ लाख ६० हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये देखील १८ हजार उच्च रक्तदाबाचे नवीन रुग्ण आढळले आहेत व त्यांना दवाखान्यात संदर्भित करण्यात येत आहेत. दरम्यान योग केंद्राचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना उद्देशून केले आहे.

१८ ते ६९ वयोगटातील ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब

-जागतिक आरोग्य संघटनेच्या 'स्टेप्स सर्वेक्षण’ २०२१ नुसार मुंबईत १८ ते ६९ वर्षे वयोगटातील ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब, १८ टक्के जणांमध्ये मधुमेह असल्याचे आढळले.

-सुमारे २१ टक्के व्यक्ती वाढलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी औषधोपचार घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

-तसेच सुमारे ३७ टक्के व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांच्या (सीव्हीडी) जोखीम घटकांपैकी तीन किंवा अधिक जोखीम घटक असल्याचे नोंदवले गेले.

-महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये एक लाखाहून अधिक रुग्ण मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता उपचार घेत आहेत.

-आहार विषयक समुपदेशन सेवा सर्व दवाखान्यांत सुरू असून त्यामध्ये ८७ हजार रक्तदाब व मधुमेही रूग्णांना सल्ला देण्यात आला आहे.

जनजागृती मोहीम

महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत हृदयरोग आणि त्याच्याशी संबंधित जोखमीच्या घटकांबाबत मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘हृदयाचा वापर कृतीकरिता करा’ (युज हार्ट फॉर ॲक्शन) ही वर्ष २०२४ करिता जागतिक हृदय दिनाची संकल्पना आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत रविवार, २९ सप्टेंबरपासून हृदयरोग व पोषक आहार याविषयी जनजागृती करण्याकरिता पोस्टर व समाज माध्यमांवर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत विविध प्रकारचे संदेश देखील दिले जात आहेत.

प्रत्येक ३० वर्षांवरील नागरिकांनी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या नियमित तपासणीसाठी महानगरपालिकेचा दवाखाना व आपला दवाखाना येथे भेट द्यावी. तसेच छातीत दुखणे व हृदयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात संपर्क साधावा. - डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई पालिका

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा