१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी एक इब्राहिम मूसा हा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (मविआ) उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार रॅलीत दिसल्याचे सांगितले जात आहे. किर्तीकर यांच्या प्रचारादरम्यान मूसा त्यांच्यासोबत असल्याचे दर्शविणारा एक व्हिडिओ गुरूवारी समोर आला आहे.
बाबा चौहान या नावाने ओळखला जाणारा मूसा हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी आहे. साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी अभिनेता संजय दत्तच्या घरी शस्त्रे नेल्याचा आरोप त्याच्यावर आहे. फिर्यादीनुसार, मूसा, गुंड अबू सालेम आणि इतरांनी १५ जानेवारी १९९३ रोजी दत्तच्या घरी जाऊन शस्त्रे दुसऱ्या दिवशी दिली जातील अशी माहिती दिली होती. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.
दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २० मे रोजी निवडणूक होणार आहे. गेल्याच महिन्यात ठाकरे गटातून शिंदे गटात उडी घेणारे रवींद्र वायकर यांचे किर्तिकरांसमोर प्रमुख आव्हान आहे.